चाकरमान्यांबाबत आमदार नितेश राणेंचे दुटप्पी धोरण

462
2
Google search engine
Google search engine

सतीश सावंत; एकीकडे सहानभुती आणि दुसरीकडे वातावरण भडकवल्याचा आरोप…

कणकवली, ता.१४ : एका बाजुला मुंबईकर चाकरमान्यांप्रती सहानुभुती दाखवायची व दुसर्‍या बाजुने चाकरमानी गावात येता कामा नयेत अशा भावना भडकवुन वातावरण कसे बिघडेल यासाठी प्रयत्न करून सरकारला बदनाम करायचे अशी दुटप्पी भुमिका आम.नितेश राणे घेत असल्याची टीका जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज केली.

कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलताना श्री.सावंत म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. उदय सामंत सिंधुदुर्गात ठाण मांडून आहेत. पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून प्रशासनाला सर्व सूचना करत आहेत. त्यांच्यासोबत आम. वैभव नाईक हे सामील आहेत.मात्र दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी सर्व पक्षीय घेतलेल्या बैठकीबाबत आम. नितेश राणे यांनी इगो दाखविण्याची गरज नव्हती. दुसर्‍याच्या चुका दाखविणे आणि टीका करणे हा आम. नितेश राणे यांचा स्थायीभाव आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आम. नितेश राणे 20 मार्चला मुंबईला गेले ते 22 एप्रिल सिंधुदुर्गात दाखल झाले.जिल्ह्यात आल्यानंतर आम. नितेश राणे आणि बैठकांचा धडाका लावला. आढावा बैठका घेतल्या. सवंग प्रसिद्धीसाठी टीकाटिपणी सुरू केली. मात्र सोनवडे येथे एक पॉजिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर ते परत मुंबईला रवाना झाले. आणि त्यांनी क्वारंटाइन विषयाबद्दल बालण्यास सुरूवात केली.
आम. नितेश राणे यांच्या घोषणा म्हणजे औषध आपल्या दारी या प्रमाणे आहेत. केरळ येथून किट आणणार, प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्या देणार या घोषणा म्हणजे औषध आपल्या दारीत प्रमाणे ठरतील असे सांगताना सतीश सावंत म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या काळात आवश्यक त्या गोष्टी सरकार व प्रशासनाच्यामार्फत केल्या जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत, आम. वैभव नाईक यांच्या समवेत आम्ही सर्व काम करीत आहोत.मात्र मुंबईत बसुन केवळ टिका करण्याचे काम आम. नितेश राणे करीत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सबाबत टीका आम. नितेश राणे यांनी केली होती मात्र ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सबाबत त्यांनी टीका केली त्याचा अवलंब सरपंचांशी संवाद साधताना करीत असताना आम. नितेश राणे यांची टीका कुठे गेली होती असा सवाल करताना सतीश सावंत यांनी केला.
आज गरज असताना आम.नितेश राणे यांनी मतदारसंघात थांबणे आवश्यक होते. मात्र स्वतःचा मतदार संघ न सांभाळता मुंबईला जाऊन बसले आणि त्यातूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका टिप्पणी करीत आहेत असे सांगताना सतीश सावंत म्हणाले, वास्तविक जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आम. वैभव नाईक यांच्यासह आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते जनतेच्या हिताचे काम करत असताना आम. नितेश राणे यांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे होते परंतु सरकारबाबत नाराजी कशी निर्माण होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.एका बैठकीत चाकरमान्यांना आणण्याची भाषा करायची दुसर्‍या बैठकीत विरोध करायचा अशा प्रकारचे दुटप्पी भूमिका नितेश राणे यांनी घेतली आहे. पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा बाजूला ठेवून सिंधुदुर्गात ठाण मांडून असताना आम. नितेश राणे यांचे काम म्हणजे टीका करणे, दुसर्‍याच्या उणिवा शोधणे त्यापलीकडे काही नसून सवंग प्रसिद्धीसाठी ते अशाप्रकारची भुमिका घेत आहेत.
आम्ही सर्व नियम पाळून आणि जनतेला चांगल्या प्रकारे सेवा मिळावी या दृष्टीने काम करत असताना नितेश राणे आणि केवळ टीका करीत राहण्यापेक्षा, आपणाला बैठकीला बोलावले नाही हा इगो जोपासण्यापेक्षा जनतेच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले असते तर सिंधुदुर्गवासीयांनी त्यांचे आभार मानले असते.मात्र आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे केवळ टीका-टिप्पणी करणे हेच आपले काम असल्यागत नितेश राणे वागत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयातील स्वॅब मशिनबाबत बोलताना सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात स्वॅब तपासणी व्हावी ही आमची भूमिका आहे यासाठी लागणारे सर्व सहकार्य आम्ही निश्चितपणे करू मात्र राजन तेली यांनी मागणीची वाट पाहण्यापेक्षा जिल्हा विकासासाठी पुढाकार घेतला असता तर फायद्याचे ठरले असते सांगताना सतीश सावंत म्हणाले जिल्हावासियांच्या भल्यासाठी राजकारण बाजुला ठेवुन पूर्ण सहकार्य राहील असे यावेळी स्पष्ट केले.