बांदा ग्रामपंचायत शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पिक विमा उतरविणार…

152
2
Google search engine
Google search engine

अक्रम खान; शहरातील भात शेती व नागली पिकांच्या नुकसानग्रस्तांना मिळणार भरपाई…

बांदा,ता.२७: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत बांदा शहरातील भातशेती व नागली पिकांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी बांदा ग्रामपंचायत सर्व शेतकऱ्यांच्या पीक विमा उतरविणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सरपंच अक्रम खान यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सर्व शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम भरणारी बांदा ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरणार आहे.
पुराच्या पाणी, नैसर्गिक आपत्ती किंवा किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी पिकाच्या नुकसानिस सामोरे जावे लागते. यासाठी शासनाने कृषी विभागाच्या मदतीने अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे केले आहेत. यामध्ये प्रति गुंठा ९ रुपये विमा रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळणार आहे. यामध्ये ४०० हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ४५ हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. यावर्षी भातशेती व नागली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार खासगी कंपनीच्या माध्यमातून पिकांचा विमा उतरविण्यात येणार आहे.
बांदा शहरातील आतापर्यंत ७५ हुन अधिक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी रुपाली पापडे व कृषी सहाय्यक आर ए वसकर यांनी दिली आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेची भरणा ग्रामपंचायत करणार असल्याची माहिती सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे. यावेळी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, उपसरपंच हर्षद कामत उपस्थित होते.