पाडलोस गावातील शेतकरी गतवर्षीच्या नुकसान भरपाई पासून वंचित…

71
2
Google search engine
Google search engine

शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली दखल; चतुर्थीपूर्वी लाभ मिळणार असल्याचे तहसीलदारांचे म्हणणे…

बांदा,ता.०६: गतवर्षी ऑगस्ट-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाडलोस गावातील ११४ शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपिकांचे ३ लाख ८९ हजार २८० रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार असे प्रशासनाकडून वारंवार सांगून कागदोपत्री खेळ करूनही अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली असता गणेश चतुर्थीच्या अगोदरच संबंधितांना भरपाई मिळणार असे सांगितले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना बाप्पा पावणार का हे लवकरच समजेल.
सावंतवाडी तालुक्यात ऑगस्ट-ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापणीयोग्य झालेले भातपीक व फळपीक जमीनदोस्त झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामेदेखील केले. मात्र, आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सुद्धा आजतागायत ११४ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांनी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक व सावंतवाडी भाजपा युवासरचिटणीस काका परब यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन तात्काळ तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन सदर प्रकरणी त्यांचे लक्ष वेधले. यावेळी महेश नाईक, सप्रेम परब, बंड्या कुबल, सिद्धेश सातार्डेकर, सिद्धेश कोरगावकर उपस्थित होते. दरम्यान, दोन वेळा हमीपत्र देऊनही भरपाई देण्यास विलंब होत असल्याने समीर नाईक यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
पाडलोससाठी आठवड्यातून दोन दिवस तलाठी
शेतकऱ्यांना वारंवार सातबारा, आठ अ, वारस नोंदणी तसेच अन्य कामांसाठी तलाठ्यांच्या दाखल्याची आवश्यकता भासते. परंतु मडुरा तलाठी कार्यालयात पाडलोससाठी तलाठी नसल्याने सावंतवाडी कार्यालय गाठावे लागते. याकडे काका परब व समीर नाईक यांनी तहसिलदारांचे लक्ष वेधले असता आठवड्यातून दोन दिवस पाडलोस गावासाठी मडुऱ्यात तलाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.