सिंधुदुर्ग जिल्हा कोविड पश्चात व तपासणी केंद्रास पालकमंत्र्यांचा हिरवा कंदील…

209
2
Google search engine
Google search engine

रविकिरण तोरसकर ; केंद्र तातडीने सुरू करण्याच्या श्री. सामंत यांच्या प्रशासनास सूचना…

मालवण, ता. २० : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा ‘कोव्हीड पश्चात तपासणी व संशोधन केंद्र ‘ सुरू करण्यास पालकमंत्री उदय सामंत यांचा हिरवा कंदील मिळाल्याची माहिती रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर, विश्वस्त रविकिरण तोरसकर, डॉ. रामचंद्र चव्हाण, डॉ. गार्गी ओरसकर यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांची ओरोस येथे भेट घेतली. कोव्हिड पश्चात होणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंतीची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. जिल्ह्यांमध्ये सुमारे पाच हजार रुग्ण कोव्हिड बाधित होऊन बरे झाले आहेत. त्यांच्यात कोरोना पश्चात वैद्यकीय गुंतागुंत आजाराच्या केसेस समोर येत आहेत. भविष्यात येऊ शकणारी कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याबरोबरच वैद्यकीय गुंतागुंत टाळण्यास जिल्ह्यात कोव्हिड पश्चात वैद्यकीय तपासणी केंद्राची व्हायला हवे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ शकणाऱ्या कोव्हिड पश्चात तपासणी व संशोधन केंद्राची संकल्पना डॉ. विवेक रेडकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या उपस्थितीत मांडली. या संकल्पनेस पालकमंत्री सामंत यांनी पाठिंबा दर्शवून भविष्यात जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे कोव्हिड पश्चात वैद्यकीय तपासणी व संशोधन केंद्र असायला हवे असे सांगितले. शिवाय अशा पेशंटमध्ये post covid inflamation व post covid thrombosis हृदयविकार व फुफ्फुसा interstitial lung disease fibrosis असे गंभीर आजारही होऊ शकतात. प्रशासनाने संबंधित विषयात तातडीने माहिती घेऊन हे केंद्र सुरू करण्याच्या सूचना श्री. सामंत यांनी केल्या.
महाराष्ट्र शासन, विश्वस्त संस्था यांच्या माध्यमातून सुरु होऊ शकणारे अशाप्रकारचे केंद्र हे उपचार व संशोधन या दोन्ही दृष्टीने राज्यातील पहिले केंद्र असेल. या संकल्पनेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी देखील माहिती घेतली. ही बैठक आयोजित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी पुढाकार घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरने या अगोदर मेडिकल वॉरियर ही संकल्पना केंद्र सरकारकडे मांडली आहे. त्याचबरोबर कोरोना लस चाचणी बाबत रेडकर हॉस्पिटल, धारगळ, गोवा याठिकाणी चाचण्या सुरू आहेत. समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र, कांदळगाव व मालवण येथील रुग्णालयात पश्चात तपासणी केंद्र सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात सुरू होऊ शकणाऱ्या कोव्हिड पश्चात तपासणी व संशोधन केंद्राचा उपयोग भविष्यात संबंधित विषयात संशोधन करून जिल्ह्यातील मृत्युदर कमीत कमी ठेवण्याचा मानस डॉ. विवेक रेडकर यांनी व्यक्त केला.
टेली मेडीसिनच्या सहाय्याने सिंधुदुर्ग टास्क फोर्स तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या व्हेंटिलेटर वापरा मधील अनुभव आयुर्वेद व होमिओपॅथी डॉक्टरना शिकवून त्यांना पण या केंद्रामध्ये सामावून घेणे शक्य आहे असे सांगितले. जेणेकरून मॉडर्न मेडिसिन डॉक्टरचा भार हलका होईल. या केंद्रामध्ये सर्वसामान्य माणसांना माफक सरकारी दरात तर दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचार मिळू शकतात असे जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले. या संकल्पनेस पाठिंबा दर्शवून त्याबद्दल तातडीने पावले उचलण्याची सूचना दिल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री तसेच आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.