कोरोना “हॉटस्पॉट” असलेल्या ग्रामीण व शहरी भागात प्रामुख्याने टेस्ट करा…

31
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले प्रांताधिकाऱ्यांचे निर्देश; तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्णय…

वेंगुर्ले,ता.१८: तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण व शहरी भागामध्ये जे हॉटस्पॉट आहेत त्यामध्ये प्रामुख्याने टेस्ट कराव्यात असे निर्देश तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांनी दिले.
कोरोना विषाणूने बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन करणेसाठी प्रांताधिकारी श्री. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ला तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आज शुक्रवारी तहसिल कार्यालय वेंगुर्ला येथे पार पडली. यावेळी तहसीलदार श्री. प्रविण लोकरे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. अमितकुमार सोंडगे, वेंगुर्ला प्रभारीगट विकास अधिकारी श्री. विदयाधर सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, वैदयकिय अधिक्षक वेंगुर्ला डॉ. अतुल मुळे, वेंगुर्ला पोलिस उपनिरिक्षक श्री. विनायक केसरकर, निवती सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. राजेंद्र हुलावले, वेंगुर्ला पोलीस श्री. पी. जी. सावंत, आएमए डॉ. राजेश्वर उबाळे, एकात्मिक बाल विकास कार्यालयाचे श्री. जयेश राऊळ, गटविकास अधिकारी श्री. गोसावी,रोटरी वेंगुर्ला यांचे प्रतिनिधी श्री. सचिन वालावलकर, आरोग्य सेविका श्रीम. व्ही. व्ही. तांडेल, आरोग्य सहाय्यक श्री. डी. बी. मोरजकर, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम. एस. बी. गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. शोभराज प्रकाश शेर्लेकर आदी उपस्थित होते.
खाजगी डॉक्टर यांचेकडे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास, सदर नागरिकांनी कोरोना टेस्ट करुन घेणेसाठी तालुका वैदयकिय अधिकारी व वैदयकिय अधिक्षक वेंगुर्ला यांनी समन्वय साधून टेस्ट होतील असे पाहावे. तसेच नागरिकांनीही कोरोना सदृश्य लक्षणे असतील तर कोरोना टेस्ट करुनच उपचार घ्यावेत. त्यामुळे योग्य उपचार होतील तसेच संभाव्य कोरोना संक्रमण रोखता येईल, असे श्री. खांडेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सध्या ग्रामपंचायत निहाय ग्रामविलगीकरण कक्ष सुरु केले आहेत. कोरोनाबाधित नागरीकांनी घरी उपचार घेण्यापेक्षा ग्रामविलगीकरण कक्षमध्ये विलगीकरण व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.