पत्रादेवी तपासणी नाक्यावर १२ लाख १४ हजाराची दारू जप्त…

6
2
Google search engine
Google search engine

गोवा पोलिसांची कारवाई; गोव्यातून महाराष्ट्राकडे होत होती वाहतूक…

 

बांदा, ता.२३ : गोव्यातून महाराष्ट्रात आयशर टेम्पोतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करताना गोवा अबकारी खात्याने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत १२ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीच्या दारुसह एकूण २९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ८ वाजता करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून महाराष्ट्र हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे अबकारी खात्याच्या पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर निरीक्षक अमोल हरवळकर, उपनिरीक्षक सलील वोल्वोईकर, अबकारी रक्षक दिलीप तिळवे, निलेश गावडे, शंकर परेकर, देविदास नाईक, विठोबा मालवणकर, सतीश तिळवे यांच्या पथकाने सापळा रचला होता. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून सिंधुदुर्ग हद्दीत जाणाऱ्या आयशर टेम्पोला (एमएच १६ सीसी ८२००) तपासणीसाठी थांबविण्यात आले.
टेम्पोच्या मागील हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे ३३० खोके आढळले. पथकाने १२ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीची दारू व १७ लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त केला. अधिक तपास निरीक्षक अमोल हरवळकर करत आहेत.