एरव्ही दहशतवादाचा बाऊ करणारे केसरकर आडाळीत झालेल्या मारहाणीबाबत गप्प का…?

2
2
Google search engine
Google search engine

एकनाथ नाडकर्णींचा सवाल; सत्ता तुमची, मग कामावर जाऊन “धुमशान” घालण्याची गरज काय…

दोडामार्ग,ता.२९: एरव्ही दहशतवादाच्या विरोधात गळा करणारे आमदार दीपक केसरकर आडाळी एमआयडीसीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या बाबत गप्प का राहिले. त्यांचे या मारहाणीला समर्थन आहे का? असा सवाल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपा नेते एकनाथ नाडकर्णी यांनी केला आहे. दरम्यान तुम्ही सत्तेत आहात मग त्या ठिकाणी सुरू असलेले काम अधिकाऱ्यांना बंद करण्याच्या सूचना दिल्या असता त्या ठिकाणी जाऊन “धुमशान” घालण्याची गरज काय होती? असाही प्रश्‍न नाडकर्णी यांनी केला आहे.

याबाबत श्री.नाडकर्णी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की,
आडाळी एमआयडीसीला पाणी पुरवठा करण्यासाठी येथील नदीवर कोल्हापूर टाईप फळ्यांचा बंधारा बांधला जातोय. या कामावर जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडले. यावेळी एका अभियंत्याला मारहाण करून मोबाईल फोडण्याचा प्रकार झाला. कामावर जाऊन दहशत निर्माण करण्यामागे उद्देश काय हे जगजाहीर आहे. त्या कामासंबंधी काही हरकत असल्यास कामावर जाण्याची गरज काय ? शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री व उद्योगमंत्री आहेत. त्यांच्याकडे दाद मागता येते. पण तस न करता मारहाण करून काय साध्य होतं ? प्रशासनाला एक आदेश दिला तर काम बंद करता येत होत. मग पदाधिकाऱ्यांनी कामावर जाण्याची गरज काय ? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.
एमआयडीसी प्रकल्प अवघ्या सहा महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणेनी मंजूर केला. पण सात वर्षात किमान सुविधा निर्मिती होतं नाही, हे दुर्दैवी आहे. आता कामगारांना मारहाण करून दहशत निर्माण करून शिवसेनेला या प्रकल्पात खोडा घालायचा आहे का ? हे आमदार केसरकरांनी जाहीर करावे, असे सांगत एरव्ही केसरकर दुसऱ्यावर दहशतीचा आरोप करतात. मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली तर त्याला पाठीशी का घालतात ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.