कडशी नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम दोन दिवसात थांबवा…

1
2
Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्ग व गोव्यातील दहा गावांची संयुक्त बैठक; अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा…

बांदा ता.३०: आडाळी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कडशी नदीवर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे काम प्रशासनाने येत्या दोन दिवसात न थांबविल्यास १ फेब्रुवारी रोजी बाधित गावातील महिला व मुलांसह प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन काम बंद पाडण्याचा निर्णय डिंगणे येथे आयोजित सिंधुदुर्ग व गोव्यातील दहा गावांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. लढा अधिक तीव्र करण्यासाठी ‘कडशी नदी बचाओ’ अभियानांतर्गत संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादात दाद मागण्यात येणार आहे.
कडशी नदीपात्रावर बंधारा बांधण्यात येत असल्याने या नदीपात्रावर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे, डोंगरपाल, नेतर्डे व गोव्यातील फकिरफाटा, तोरसे, उगवे, मोपा, तांबोसे, वजरी, विर्नोडा या गावातील शेती-बागायती व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. या बंधाऱ्याविरोधात डिंगणे, डोंगरपाल ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. कडशी नदी बचाओसाठी काल रात्री उशिरा डिंगणे ग्रामपंचायत येथे बाधित दहा गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सर्व दहा गावातील व्यंकटेश नाईक, गोपाळ शेटये, साईनाथ देसाई, उमेश गाड, विठू महाले, जयेश सावंत, संजय डिंगणेकर, दिवाकर मावळणकर,महेश परब,विलास सावंत, यशवंत सावंत, महादेव सावंत, दिनेश सावंत, नाना सावंत, लाडू गवस, श्रीकांत गवस, विश्वनाथ गवस, आरोही गवस, गीता सावंत, शैलेश लाड यांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली.
व्यंकटेश नाईक यांनी यावेळी कावेरी व म्हादई लढ्याची पार्श्वभूमी सांगत या पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू. यावेळी आर-पार ची लढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.