सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेचा मार्ग सुकर…

2
2
Google search engine
Google search engine

आवश्यक परवानगी मिळाली; यावर्षी पासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार…

सावंतवाडी/ अमोल टेंबकर,ता.१०: सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेली कायमची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या वर्षीपासून शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. याबाबतची माहिती शासकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात तत्वतः मान्यता मिळाल्याने आणि त्यानंतर ती पुन्हा रद्द करण्यात आल्यामुळे मोठा गदारोळ उठला होता. परंतु आता कायमची मान्यता मिळाल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

दरम्यान याबाबत कृती समितीच्या माध्यमातून प्रतिक्रीया देण्यात आली आहे. यात असे म्हटले आहे की, जिल्हावासीय २०१७ पासून यासाठी लढा देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती, जिल्हा सिंधुदुर्गच्या नेतृत्वात हा लढा उभा राहिला. १३० ग्रामसभांचे ठराव, उपोषण, २५,००० पत्र लेखन, रक्तदान आंदोलन, इमेल/ ट्विटर च्या माध्यमातून केलेला पाठपुरावा, निवेदने असे अनेक मार्गांनी हा विषय नेतृत्वापुढे लावून धरला.

यासाठी प्रशासनाने सुद्धा अथक प्रयत्न केले. विशेष म्हणजे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बांधवांनी हा विषय सतत लावून धरल्यामुळे दबाव कायम होताच. या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी चांगले डॉक्टर घडणार तसेच सिंधुदुर्गातील जनतेची गोवा, बेळगाव, कोल्हापूर, डेरवण, मुंबई पर्यंत होणारी पायपीट थांबून उत्तम दर्जाची सेवा आमच्या जिल्ह्यात उपलब्ध होणार, यात काही शंका नाही. येथील तरुणतरुणींना नौकरी उपलब्ध होतील, विविध व्यवसायाचे पर्याय उपलब्ध होतील. जिल्ह्यात सर्वोत्तम उपचारांसह रोजगार निर्मिती होईल ही आनंदाची बाब आहे.