थकबाकीदार असलेल्‍या राणेंना संचालक बनविणे योग्‍य नाही…

4
2
Google search engine
Google search engine

सुशांत नाईक यांची टीका ; निकष डावलून स्वीकृत संचालक निवड…

कणकवली,ता.१८: आमदार नीतेश राणे हे जिल्‍हा बँकेचे थकबाकीदार आहेत. तसेच ते जिल्‍हा बँकेचे मतदारही नाहीत. त्‍यामुळे अशा व्यक्‍तीला जिल्‍हा बँकेचे स्वीकृत संचालक बनविणे ही योग्‍य बाब नाही. कदाचित राणे समर्थकांना जिल्‍हा बँक हा राजकारणाचा अड्डा बनवायचा असेल म्‍हणून त्‍यांनी राणेंना जिल्‍हा बँकेवर आणले असावे अशी टीका कणकवली नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते आणि जिल्‍हा बँक संचालक सुशांत नाईक यंानी आज केली.

श्री.नाईक म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा, त्‍यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालक पदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवण्यात आले. सत्ताधारी संचालक पॅनलकडून चक्‍क आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले.

ते म्‍हणाले, आमदार नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यांना जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदानाचा देखील अधिकार देखील नव्हता. तरीही थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनविणे हे बँकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही.

ते म्‍हणाले, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम खंड ११ मधील तरतूदीनुसार तज्‍ज्ञ संचालक याचा अर्थ बँकिंग, व्यवस्थापन, सहकार व वित्त व्यवस्था या क्षेत्रामधील अनुभव असलेली व्यक्ती असा आहे. त्यामध्ये संबंधित संस्थेने हाती घेतलेली उद्दिष्टे व कार्य यांच्याशी संबंधित अन्य कोणत्याही क्षेत्रातील विशेषज्ञता धारण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये. अशी अपेक्षा आहे.