सावंतवाडीत संशयास्पद फिरणाऱ्या परप्रांतियांच्या टोळक्याला मनसेने दिले पोलिसांच्या ताब्यात…

2
2
Google search engine
Google search engine

शटर दुरुस्ती, सर्कसच्या नावाखाली शहरात प्रवेश; संबंधितांची चौकशी करा, आशिष सुभेदार…

सावंतवाडी,ता.१२: शटर दुरुस्ती आणि सर्कसच्या नावाखाली शहरात फिरणाऱ्या परप्रांतियांच्या टोळक्याला आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान संबंधित टोळक्यातील व्यक्ती संशयास्पद दिसत असून त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांची ओळख पत्र ते याठिकाणी वास्तव्यास असेपर्यंत पोलिसांनी ताब्यात घ्यावी. शटर दुरुस्तीच्या नावाखाली भविष्यात त्यांच्याकडून चोरी सारखे प्रकार घडू शकतात, त्यामुळे त्यांना तशी समज देण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पोलिसांकडे केली आहे. तर व्यापारी नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी, असे आवाहन मनसेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित टोळक्यातील व्यक्ती काल येथील रेल्वे स्टेशनला उतरून सावंतवाडी शहरात दाखल झाले. यात पाच ते सहा जणांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. दरम्यान त्यांनी कालपासून शटर दुरुस्ती आणि सर्कसच्या नावाखाली संपूर्ण शहर पिंजून काढले. यातील काही जण आपण शटर दुरुस्तीचे काम करतो, असे सांगत आहेत. तर काहीजण हातात सर्कस फोटोच्या फाईल घेऊन आपण या ठिकाणी येत्या दोन दिवसात सर्कस भरवणार आहोत. त्याचे प्रमोशन करीत आहोत, असे सांगत आहेत. मात्र मनसेच्या माध्यमातून श्री. सुभेदार यांनी प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केली. यावेळी त्यांच्या बोलण्यात कोणतेही साधर्म्य आढळले नाही. प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे मिळू लागल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी सतर्कता म्हणून याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यातील दोघांना ताब्यात घेतले असून त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे व्यापारी नागरिकांनी सुद्धा या व्यक्तींपासून सतर्क राहावे, शटर दुरुस्तीच्या नावाखाली संबंधित व्यक्ती आपल्या दुकानाची टेहाळणी करून घेऊ शकतात, व भविष्यात चोरी सारखा प्रकार घडू शकतो, त्यामुळे खबरदारी बाळगावी, असे आवाहन श्री. सुभेदार यांनी केले आहे. यावेळी उपतालुका अध्यक्ष प्रकाश साटेलकर उपस्थित होते.