भुईबावडा-तळीवाडी येथील रहदारीची वाट खुली करा, अन्यथा ९ मे रोजी उपोषण…

1
2
Google search engine
Google search engine

तळीवाडी ग्रामस्थांचा इशारा; वैभववाडी तहसिलदारांना दिले निवेदन…

वैभववाडी,ता.३०: भुईबावडा तळीवाडी येथील पुरातन रहदारीची पायवाट खुली करावी. अन्यथा दि. ९ मे रोजी वैभववाडी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा तळीवाडी ग्रामस्थांनी वैभववाडी तहसिलदारांना निवेदनाव्दारे दिला आहे.

तळीवाडी येथील ग्रामस्थांनी सरकार दरबारी अनेक वेळा अर्ज विनंत्या व उपोषणे करून भुईबावडा ते तळीवाडी असा डोंगराळ भागातील ३ कि. मी. चा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शासनाकडून मंजूर करून घेतला. सदर रस्त्याचे खोदकामही पूर्ण झाले आहे. सदर रस्ता हा पुरातन पायवाटेवरून खोदकाम करून तयार करण्यात आला आहे. परंतु खोदकाम पूर्ण झाल्यानंतर सदर वाडीतील गट नं. ३३५ चे जमिनदार ग्रामस्थ मनोज मारुती माने व बाबाजी हरिश्चंद्र माने यांनी सदर पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत झालेल्या रस्त्यास कोर्टात जाऊन खोटे कागदपत्र सादर करून कोर्टाची दिशाभूल करून स्थगिती आदेश घेतले व रस्त्याचे गट नं. ३३५ पासून पुढे काम बंद पाडले.

सदर रस्ता हा गाव नकाशातील पुरातन पायवाटेवरूनच खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे पुरातन पायवाट ही नष्ट झालेली आहे. सदरील ग्रामस्थाने त्या पायवाटेवर कुंपण घालून घेतले आहे. तसेच सदर पायवाटेचा उपयोग हा स्वतःसाठी करून स्थानिक ग्रामस्थांना जाण्यास मनाई करत आहे. सदर रस्त्याचे काम बंद असल्याने इतर ग्रामस्थांना ये-जा करण्याकरिता असलेली पुरातन पायवाट शासन निर्णय परिपत्रकाप्रमाणे खुली करून द्यावी म्हणून वैभववाडी तहसिल कार्यालयात गेली ७ वर्षे वेळोवेळी अर्ज विनंत्या व उपोषणे करून देखील आजतागायत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. सदरील केस गेली सात ते आठ वर्षे तहसिल कार्यालय व कोर्टात प्रलंबीत आहे. तरी सदरील पुरातन पायवाट खुली करावी अन्यथा दि. ९ मे रोजी आबालवृद्धांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा तळीवाडी ग्रामस्थांनी वैभववाडी तहसिलदारांना निवेदनाव्दारे दिला आहे.