पंचवीस हजार वृक्ष लागवड मोहीमेचा २१ तारखेला शुभारंभ…

18
2
Google search engine
Google search engine

सुधीर सावंत; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हाभर उपक्रम…

सिंधुदुर्गनगरी,ता.१९: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरु बाळ डॉ. संजय भावे यांच्याहस्ते २१ जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर सुधिर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा मुख्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर सावंत म्हणाले, हवेतील कार्बनडायऑक्साइड कमी करण्यासाठी झाडांची लागवड अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून सैनिक फेडरेशन व सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान यांनी अनेक संस्थाशी चर्चा करून एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा हजार झाडे लावण्याचे मिशन २१ जून पासून सुरू करण्यात येत आहे. भावी पिढीच्या आनंदी व समृध्द जीवनासाठी पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ईकॉलॉजिकल टास्क फोर्स एक कंपनी औरंगाबाद येथे स्थापन करण्यात आली होती. सन २०१८ पासून जवळजवळ १५ लाख झाडं लावण्यात व टिकवण्यात आली आहेत. तसेच आणखी दोन कंपन्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या सुद्धा औरंगाबाद येथे स्थापन करण्यात येतील. एका कंपनीमध्ये १०० माजी सैनिक घेतले जातील. त्यांचे काम पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आहे. मी खासदार झाल्यावर प्रादेशिक सेनेमध्ये दाखल झालो होतो. त्यावेळी पूर्ण देशांमध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. जैसलमेर येथे सुरू करून १५ कोटी झाडे लावण्यात आली होती. तसेच हिमाचल, दिल्ली, आसाम व मध्य प्रदेश मध्ये ईकॉलॉजिकल टास्क फोर्स बनवण्यात आले. महाराष्ट्र मध्ये अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर २०१८ पासून सुरू झाल्या. त्यात माजी सैनिकांना घेऊन झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला जातो. त्याचबरोबर सरकारला विविध कामांमध्ये मदत करण्याची भूमिका असते. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस पण आहे. त्या दिवशी ओरोस येथे छत्रपती शिवाजी आरोग्य केंद्रामध्ये योग प्रशिक्षण व थेरपी उपचार केंद्राची स्थापना दापोली कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, शिवाजी स्मारक मंडळ, सैनिक स्कुल, सैनिक पतसंस्था, बाल शिवाजी इंग्लिश स्कुल, ताराबाई एज्युकेशन सोसायटी यांच्या सयुंक्त विद्यमाने आणि विविध संस्थांच्या सहकार्यातून वर्षभर शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीचे औचित्य साधून २ जून रोजी सावंतवाडी संस्थानचे मा. युवराज श्री. लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षाचा शुभारंभ झाला. या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञतेने स्मरण करणे, त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा आदर करणे व नव्या पिढीपर्यंत महाराजांचा पराक्रमी वारसा पोहचविणे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वृक्ष लागवड अभियान राबवून या वर्षी २५ हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे. तसेच योग प्रशिक्षण व थेरपी उपचार केंद्राची स्थापना करण्याचे योजिले आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षा निमित्त वृक्ष लागवड अभियान शुभारंभ , योग प्रशिक्षण व थेरपी उपचार केंद्राची स्थापना व कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या सत्कार समारंभ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे आवाहन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे डॉ. विलास सावंत, भास्कर काजरेकर ,अनघा रामाने ,अब्दुल शेख, मनवेल फर्नांडिस, आदी उपस्थित होते.