चतुर्थीपूर्वी पार्किंग आणि विक्रेत्यांच्या व्यवस्थेचे नियोजन करा

143
2
Google search engine
Google search engine

संदेश पारकर यांची हायवे उपअभियंत्यांशी चर्चा; सर्व्हीस रोडची रूंदी वाढविण्याची मागणी

कणकवली, ता.२२:गणेशचतुर्थीपूर्वी कणकवली शहरात पार्किंग व्यवस्थेचे नियोजन व्हायला हवे. तसेच चौपदरीकरणाचे काम जेथे ठप्प आहे तेथे शहाळी, भाजी विक्रेते यांची व्यवस्था करा. याखेरीज शहरातील सर्व्हीस रोडची रूंदी वाढवा जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी आज केली. तर त्याबाबतची कार्यवाही पुढील दोन दिवसांत केली जाईल अशी ग्वाही उपअभियंता अमोल ओटवणेकर यांनी केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर येथील प्रांताधिकारी कार्यालयात भाजप युवा नेते संदेश पारकर यांनी महसूल आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी प्रभारी प्रांताधिकारी रोहिणी रजपूत, हायवे उपअभियंता अमोल ओटवणेकर, शाखा अभियंता गणेश महाजन, प्रभारी तहसीलदार आर.जे.पवार, भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावंत पटेल, नगरसेवक रूपेश नार्वेकर, महेश सावंत, बीएसएनएलचे श्री. कमलापूरकर दिलीप बिल्डकानचे उमेश कुमार, कपिल कुमार आदी उपस्थित होते.
शहरातील सर्व्हीस रोड अरुंद आहे. दोन वाहने तेथून पास होत नाहीत. त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत सर्व्हीस रोड वरील पत्र्याचे बॅरीकेट हटवून महामार्ग रूंद करा तसेच सर्व्हीस रोड लगत पाच ते दहा फुटाची मोकळी जागा आहे. तेथे सिमेंट क्राँक्रिट अथवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी संदेश पारकर यांनी केली.
उपअभियंता श्री.ओटवणेकर यांनी सर्व्हीस रोड लगतचे बॅरिकेट हटविणे शक्य नाही. मात्र सर्व्हीस रोडलगत जेथे मोकळी जागा आहे तेथे क्राँक्रिटीकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तर गणेशोत्सव कालावधीत शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बसस्थानक ते स्टेट बँक या दरम्यान पिलरच्या लगत वाहन पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. तसेच याठिकाणी भाजी, फळ तसेच इतर विक्रेत्यांसाठी जागा केली जात असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
प्रांताधिकारी कार्यालयासमोरील डायव्हर्शन बंद करण्यात आले आहे. तर बसस्थानकासमोरील डायव्हर्शन पाऊस पडल्यानंतर चिखलमय होतो. तेथे डांबरीकरण करा. तसेच नरडवे तिठा ते शिवाजी चौक या दरम्यान नवीन डायव्हर्शन सुरू करा. सर्व्हीस रोडवरील स्ट्रीट लाइनचे दिवे कमी वॅटचे आहेत. त्यांची क्षमता वाढवा अशीही मागणी श्री.पारकर यांनी केली. तर याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन श्री.ओटवणेकर यांनी दिले.
शहरात पटवर्धन चौक परिसरात 12 मिटरचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर सतत वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते असा मुद्दा श्री.ओटवणेकर यांनी मांडला. त्यानंतर श्री.पारकर यांनी पोलिस निरीक्षक श्री.कोळी यांच्याशी संपर्क साधून महामार्गावर वाहने उभी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी केली.
महामार्ग समस्या ऐकून घेण्यासाठी तात्पुरते संपर्क कार्यालय सुरू होणार होते. त्याचे काय झाले? असा प्रश्‍न संदेश सावंत-पटेल यांनी केला. मात्र आमच्याकडे दोनच अभियंते आहेत. इतर मनुष्यबळ नसल्याने संपर्क कार्यालय सुरू करता येणे शक्य नसल्याची माहिती श्री.ओटवणेकर यांनी दिली. तर जानवली नदीवरील नवीन पुलाचे काम अर्धवट आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी दिलीप बिल्डकॉनकडे दिली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचीही माहिती उपअभियंता श्री.ओटवणेकर यांनी दिली.
शहरातील उड्डाणपूल हे 44 पिलरचे आहे. त्यावर बॉक्स गर्डर बसवून स्लॅब टाकण्यात येणार आहे. हे काम पुढील सात आठ महिन्यात पूर्ण होईल. उड्डाणपूल झाल्यानंतर सर्व्हीस रोडची रूंदी वाढविण्यात येणार असल्याचे श्री.ओटवणेकर म्हणाले. दरम्यान कणकवलीच्या उड्डाणपुलाला स्व. अप्पासाहेब पटवर्धन, तळेरे येथील उड्डाणपुलाला कै. वामनराव महाडीक तर कुडाळ येथे होणार्‍या उड्डाणपुलाला कै. ब. नाथ पै उड्डाणपूल असे नाव द्यावे अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा अशी मागणी श्री.पारकर यांनी केली.
कणकवली शहरातील एक हजार हून लॅण्डलाईन ठप्प आहेत. ते पूर्ववत करण्यासाठी गडनदी ते जानवली नदी या दरम्यान केबल जोडणी सुरू आहे. नवीन केबल पुढील दोन दिवसांत येईल. त्यानंतर केबल जोडणीचे काम सुरू करू अशी माहिती बीएसएनएलचे अधिकारी श्री.कमलापूरकर यांनी या बैठकीत दिली. तर वाहतूक कोंडी निवारण्यासाठी दिलीप बिल्डकॉननचे दहा कर्मचारी उद्यापासून हायवेवर तैनात होतील असे श्री.ओटवणेकर म्हणाले.