एसटीत चढणार्‍या चौकुळ येथील महिलेला सावंतवाडीत बसस्थानकावर लुटले…

671
2
Google search engine
Google search engine

तब्बल सव्वा लाखाचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.०१: एसटी बसमध्ये चढणार्‍या चौकुळ येथील एका महिलेला अज्ञात चोरट्याने दिवसा ढवळ्या लुटले. वनिता विष्णू गावडे (रा.पाटीलवाडी) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानक परिसरात घडला. यात तिच्या पर्स मध्ये असलेले सुमारे सव्वा लाख रुपयाचे दागिने लंपास झाले आहेत.

दरम्यान घटनेनंतर ती बस पोलिस ठाण्यात नेण्यात आली. परंतू संशयित मिळाला नाही. दरम्यान तीने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तिचा तीन तोळे ९० हजार किमतीचा सोन्याचा हार, ३० हजार किंमत असलेले कानातले आणि १ हजार किमतीची नथ असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या सकाळी खरेदीसाठी सावंतवाडीत आल्या होत्या. तेथून परत जाण्यासाठी त्या सावंतवाडी इचलकरंजी बस मध्ये चढत होत्या. यावेळी मागून आलेल्या अज्ञाताने त्याच्या पर्स मध्ये हात घालून आत ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविले अशी त्यांची तक्रार आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाणे अमंलदार ज्योती दुधवडकर यांनी दिली.