राणे की सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा कायम… 

491
2
Google search engine
Google search engine

कार्यकर्ते संभ्रमित; दोन्ही पक्ष निर्णयावर ठाम, चर्चेचे गुऱ्हाळ सुरू…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.३१: सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपासह शिवसेना दोघेही ठाम आहेत. त्यामुळे अद्याप पर्यंत या मतदारसंघात महायुतीचा नेमका उमेदवार कोण? याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. एकीकडे भाजप चिन्हावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही निवडणूक लढवावी. आगामी काळात त्यांच्या रूपाने कोकणात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपद मिळेल, अशी अट भाजपाची आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या माध्यमातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत ही निवडणूक लढवण्यासाठी जोरदार इच्छुक आहेत. मात्र तिकीट कोणाला मिळेल याबाबत तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे दोन्ही बाजूने या जागेवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप पर्यंत सुरू आहे.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून होळीच्या तोंडावर प्रचाराची धुळवट रंगली आहे. ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी आपली जोरदार तयारी सुरू केली असून खळा बैठका, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. काही झाले तरी तिसऱ्यांदा आपण खासदार म्हणून सहज निवडून येऊ, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा प्रचार सुरू झाला असला तरी अद्याप पर्यंत महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. या ठिकाणी शिवसेनेकडून भैया उर्फ किरण सामंत यांचे नाव चर्चेत होते. परंतु ही जागा भाजप कमळ या चिन्हावर लढविण्याबाबत ठाम आहे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच ही जागा लढवावी अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मांडली आहे. त्यामुळे जागा कोणी लढवावी याबाबत अद्याप पर्यंत तिढा सुटलेला नाही. परिणामी महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आता निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचार होणार कधी, लोकांपर्यंत आमचा उमेदवार पोहोचणार कसा, अशी चर्चा महायुतीच्या पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यात रंगली आहे. तर दुसरीकडे उमेदवारच मिळत नसल्यामुळे काही झाले तरी खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या सर्व धामधुमीत नेमका उमेदवार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांतून विचारला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत विचारले असता चर्चा सुरू असून लवकरच याबाबत तोडगा काढला जाईल, असे सांगितले होते. परंतु अद्याप पर्यंत निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेमके तिकीट राणेंना मिळते की सामंत यांना हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.