नुसते बाहेरून सुशोभीकरण नको, कोकण रेल्वेच्या समस्या सोडवा… 

142
2
Google search engine
Google search engine

कोकण रेल्वे संघर्ष समिती; अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना इशारा…

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: सुशोभीकरणामुळे रेल्वे स्थानकांचे सौंदर्य जरी वाढले तरी यातून समस्या सुटलेल्या नाहीत, त्यामुळे कोकणला वरदान ठरणारी कोकण रेल्वे कोकणातून जाऊन देखील याचा फायदा गोवा, केरळसह अन्य राज्यांना मिळत आहे, अशा अनेक समस्या असून कोकणातील प्रवाशांना जनावरांप्रमाणे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत त्वरित दखल न घेतल्यास १५ ऑगस्टला उपोषण व त्यानंतर रेल रोको सारखी आंदोलने केली जातील, असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती व संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आला.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश पावस्कर, सचिव मिहीर मठकर, सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष शुभम परब, राजन परब, महादेव मठकर, नागेश ओरोसकर, भूषण बांदिवडेकर, सुहास परब, अजय मयेकर, संजय वालावलकर, साई बांदिवडेकर, स्वप्निल गावडे, सुभाष शिरसाट, आदींसह मोठ्या संखेने समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, कोकणला वरदान ठरणारी कोकण रेल्वे कोकणातून जाऊनही फायदा मात्र गोवा, केरळसह अन्य राज्यांना मिळत आहे. अनेक जलद गाड्यांना सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर थांबा नाही, तिकीट कोटाही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणातील प्रवाशांना जनावरांप्रमाणे प्रवास करावा लागत आहे. दरम्यान ‌विधान सभेच्या २६ जून पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत अन्य राज्यांच्या आमदार खासदारांप्रमाणे कोकणातील सर्व आमदारांनी एकत्र होऊन रेल्वेचे प्रश्न सोडविण्याबाबत ठराव मंजूर करून घ्यावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा रेल्वे संघर्ष व समन्वय समितीच्या वतीने सर्व आमदार व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विधानसभेच्या सभापतींकड़े करण्यात आले आहे.

यावेळी करण्यात आलेल्या मागणीमध्ये कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे मध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावे, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण करून त्याला प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे, पनवेल रेल्वे टर्मिनस चे काम येत्या गणपती पूर्वी पूर्ण करून त्यांना स. का पाटील यांचे नाव देण्यात यावे, परळ टर्मिनसचे काम पूर्ण करून त्या टर्मिनसला चैत्यभूमी टर्मिनस असे नाव देण्यात यावे, वसई वरून सावंतवाडीकरिता रेल्वे बोर्डाकडे स्वतंत्र गाडीची मागणी करणे, कल्याण वरून सावंतवाडी करिता स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात यावी, कसाल रेल्वे स्टेशन जे कोकण रेल्वेच्या नकाशात पूर्वी होते अजूनही ते स्टेशन बांधले नाही ते पूर्ण केले जावे. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करणे व तातडीने कामाला सुरुवात करणे, कोकण रेल्वे मार्गावर दादर ते रत्नागिरी-सावंतवाडी मडगाव कोकण कन्या नंतर मुंबईकडे जाणारी व कोकण कन्या आधी मुंबईहून रत्नागिरी सावंतवाडी मडगाव कडे येणारी लोकल रेल्वे ट्रेन सोडावी, सध्या कोकणातून दक्षिण भारतात सुसाट जाणाऱ्या आणि ज्यांचा प्रवासाचा जवळ जवळ आठ तासाचा वेळ वाचतो त्यातील फक्त अर्धा तास महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांना देऊन सर्व गाड्यांना महाराष्ट्रातील काही स्थानकावर थांबा देण्यात यावा.

कोकणातून पंधरा लांब पल्ल्याच्या गाड्या अन्य राज्यात जातात. मात्र या गाड्या रत्नागिरी नंतर मडगाव पर्यंत कुठेच थांबत नाहीत. अशा सर्व गाड्यांना रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग स्टेशन मध्ये थांबा देण्यात यावा. सावंतवाडी वरून सकाळी सुटणारी व दिव्याला रात्री पोहोचणारी गाडी पुन्हा रात्री नऊ वाजता दिव्यावरून पुन्हा सावंतवाडीकरीता सोडावी व दिवा येथून सकाळी सुटुन सायंकाळी सावंतवाडीला पोचलेली गाडी पुन्हा ९ वाजता रात्री दिव्या करता रवाना करावी. पुण्यावरून पनवेल मार्गे सावंतवाडी करता स्वतंत्र गाडी सोडण्यात यावी. कोकण रेल्वे मार्गावरून थेट बेंगलोर मॅजेस्टिक रेल्वे स्थानक पर्यंत एकही गाडी सुरू नाही ती सुरू करण्यात यावी. अन्यथा १५ ऑगस्ट ला बेमुदत आंदोलन छेडले जाईल व भविष्यात रेल रोको आंदोलन होईल, असे यात म्हटले आहे.