सावंतवाडीत एकाच दिवशी तीन चोऱ्या झाल्याचे उघड…

251
2
Google search engine
Google search engine

तिसरी घटना चराठेतील;चोरटयांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान…

सावंतवाडी ता.२५: शहरात काल दुपारी दोन घरफोड्या झाल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळी उशिरा चराठा येथे आणखीन एक घरफोडी झाल्याची घटना उघड झाली आहे.या चोरीत दहा हजारांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे.याप्रकरणी लवू राजाराम चव्हाण (५२)यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान एकाच दिवशी तीन चोर्‍या घडल्यामुळे सावंतवाडी पोलिसांसमोर आता या चोरट्यांना शोधण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.त्यामुळे या संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस आता कोणत्या पद्धतीने तपास करतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,चव्हाण हे सकाळी आपल्या पत्नी समवेत कामानिमित्त बाहेर गेले होते.दरम्यान ते काल सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मागील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला,चोरट्याने मागील दरवाज्याची आतील कडी काढून आत प्रवेश करत , कपाटाच्या लॉकर मधील दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.चोरीची घटना उघडकीस येताच त्यांनी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
काल दुपारच्या सत्रात चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.यात माजगाव-गरड व खासकीलवाडा येथील दोन्ही घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण ८ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.याबाबत भक्ती भरत गवस (रा.खासकिलवाडा) व अनुष्का आनंद देसाई (रा.माजगाव-गरड) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात काल तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलीस ठाण्यात दोन्ही घरफोडींच्या नोंदी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.