कास -शेर्लेतील कोविड केअर सेंटर रद्द न केल्यास जनआंदोलन…

230
2
Google search engine
Google search engine

बांदा भाजपा मंडळाचा इशारा; सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन…

बांदा ता.२३:सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कास सीमेवर डिवाईन मर्सी येथे कोविड केअर सेंटर उभारण्यास दशक्रोशीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.गावाच्या वतीने सर्व सरपंचांनी तसे लेखी निवेदनही सावंतवाडी प्रांताधिकारी यांना दिले आहे.असे असतानाही प्रशासनाकडून त्याच ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारणीच्या हालचाली सुरु आहेत.सदर कोविड सेंटर रद्द करुन तालुक्याच्या मध्यवर्ती भागात हलवावे.अन्यथा भाजपातर्फे जनआंदोलन उभारण्याचा इशारा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी लेखी निवेदनाद्वारे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिला आहे.
शेर्ले-कास सीमेवर डिवाईन मर्सी येथे परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरु केले आहे. मात्र, आता कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या पेशंटसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांनी तसे आदेशही आरोग्य विभागाला दिले आहेत. याचे तीव्र पडसाद दशक्रोशीतून उमटत आहेत.शेर्ले, कास, मडूरा, रोणापाल, निगुडे, इन्सुली ग्रामपंचायत मार्फत कोविड केअर सेंटर उभारण्यास विरोध असल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाकडून कोविड सेंटर उभारण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपा बांदा मंडळच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधण्यात आले. तालुकाध्यक्ष महेश धुरी यांनी दशक्रोशीतील सर्व गावांचा कोविड सेंटर उभारण्यास विरोध असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या बाजूने भाजपा असून कोविड सेंटर रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी सावंतवाडी सभापती मानसी धुरी, जि. प. सदस्या उन्नती धुरी, शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, विकी केरकर, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर, प्रविण पंडीत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.