पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा…

14
2
Google search engine
Google search engine

कणकवली पत्रकार समितीची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन…

कणकवली,ता.१७: पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा अशी मागणी आज कणकवली पत्रकार समितीने केली. याबाबतचे निवेदन समितीचे अध्यक्ष अजित सावंत यांनी नायब तहसीलदार गौरी कट्टे यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे निवेदन देत असून आमच्या भावना प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना कळवाव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना पत्रकार समितीचे संतोष वायंगणकर, दिगंबर वालावलकर, योगेश गोडवे, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, पत्रकार चंद्रशेखर तांबट, भगवान लोके, भास्कर रासम, उमेश बुचडे, दर्शन सावंत उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार आज राज्यभर निदर्शने करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हे आंदोलन होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना, धमक्या, शिवीगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायद्याची भीतीच समाजकंटकांचा मनात उरली नाही. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिवीगाळ केली आणि दुसर्‍या दिवशी आपल्या गुंडानकडून त्यांच्यावर हल्ला चढविला. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडांवर किंवा शिवीगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही.
पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील ७५ टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात. असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थांबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे अशी आमची विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.