सिंधुदुर्गात प्लॅस्टिक मुक्तीसाठी ‘पुढचे पाऊल’

95
2
Google search engine
Google search engine

जिल्हा परिषदेचा उपक्रम:२ ऑक्टोबरला प्लॅस्टिक पिक-अप डे

सिंधुदुर्गनगरी, ता.३०
जिल्ह्यातील प्लॅस्टिक कचरा एकाचवेळी गोळा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन ‘प्लॅस्टिक पिक अप डे’ या महाश्रमदान कार्यक्रमांचे आयोजन १५० व्या गांधी जंयतीचे औचित्य साधुन २ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आले आहे. या महाश्रमदान कार्यक्रम व स्वच्छता शपथ कार्यक्रमांत सर्व जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्यावतीने महात्मा गांधी याच्या १५० व्या जंयतीचे औचित्य साधुन ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ११ सप्टेबर ते १ ऑक्टोबर कालावधीत पुर्व तयारी आणि जनजागृती करून २ ऑक्टोबर रोजी देशभर शपथ आणि श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
२ ऑक्टोबर रोजी महाश्रमदान कार्यक्रमात गोळा होणा-या प्लॅस्टिक कच-याची कार्यक्षम विल्हेवाट ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संपुर्ण अभियान कालावधीत प्लॅस्टिक कचरा या विषयावर जनजागृती घडवुन प्लॅस्टिक गोळा करण्याचे तत्व जोपासले जाणार असून हाच या अभियानाचा उद्देश आहे.
२ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकाचवेळी प्लॅस्टिक कचरा गोळा करण्याकरीता पिक अप प्लॅस्टिक डे चे आयोजन सकाळी ८ ते ११ वा. या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक उदा. कॅरीबॅग्ज व पातळ पिशव्या, ५० मायक्रोन पेक्षा जास्त जाडीच्या पिशव्या उदा. दुधाच्या पिशव्या, अपारदर्शक प्लॉस्टिक, मल्टिलेअर प्लॉस्टिक, वेफर पॅकेट, फ्रुटी, कुरकुरे यांची आवरणे, प्लॉस्टिक बॉटल, धोकादायक प्लॉस्टिक उदा. तेलाच्या पिशव्या, कॅन, औषधाच्या बाटल्या, किटकनाशकांच्या बाटल्या व पिशव्या आदी या प्रमाणे विगतवारी करुन गोळा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद याच्या अधिनस्त असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी या श्रमदान कार्यक्रमांत सहभागी होणार आहे. या कार्यक्रमांत जमा झालेल्या प्लास्टिक कच-याची कार्यक्षम विल्हेवाट जिल्ह्यातील नगरपालिका, कचरा वेचक याच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. सर्व जिल्हावासियांनी २ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित पिकअप प्लॅस्टिक डे या महाश्रमदान कार्यक्रम व स्वच्छता शपथ कार्यक्रमांत सहभाग घेऊन जिल्हा प्लॅस्टिक मुक्त होण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.