मुख्यमंत्री, परिवहनमंत्री आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा…

248
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली पोलीस ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे निवेदन…

कणकवली, ता.२५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी याच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य, परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिकाऱ्यांवर केलेली दमदाटी आणि खासदार संजय राऊत यांनी केलेले आक्षेपार्ह लिखाण या विरोधात कायदेशीर कारवाई करा.या तिघांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी कणकवली पोलीस ठाण्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.
भाजपा चे कणकवली शहर मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत,जिल्हा कार्यलय प्रमुख समर्थ राणे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आघाडी सरकारने २४ ऑगस्ट रोजी भाजपा नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली होती. ही घटना निंद्यनिय असून सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली होती.या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी ज्याप्रकारे कारवाई साठी सरकारी अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह दमदाटी करत अटक करण्याचे आदेश दिले ती बाब निश्चितपणे निषेधार्थ आहे.याबाबतची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर प्रसारित झालेली आहे,त्यामुळे त्यांच्या या आततायी वागण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच या संदर्भात दैनिक सामना मध्ये ज्या पद्धतीने भडक आणि अपमानास्पद लिखाण प्रसिद्ध करण्यात आले आहे ती बाबही निषेधार्थ आहे. त्यामुळे सदर दैनिकाच्या संपादक मंडळींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
हे अटक प्रकरण नारायण राणे यांच्या ज्या विधानावरून करण्यात आले.त्या प्रकारची किंबहुना त्याही पेक्षा वाईट विधाने आमच्या नेत्यांच्या संदर्भात संबंधित पक्षाच्या नेत्यांकडून यापूर्वी करण्यात आलेली आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाईचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याविषयी जाहीर भाषणात काढलेले अनुद्गार सर्वश्रुत आहेत,त्या भाषणाची क्लिप सुद्धा समाज माध्यमात प्रसारित झालेली आहे.त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी.
स्वतःसाठी वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका घेणाऱ्या या सरकारचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी करत असून वर उल्लेख केलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मंत्रीअनिल परब आणि सामना दैनिकाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी,त्यांच्यावर त्वरित गुन्हे नोंद व्हावेत अशी मागणी आम्ही आपल्या माध्यमातून गृह विभाग आणि सरकारकडे करत आहोत.अश्या पद्धतीने गुन्हे नोंद होऊन कारवाई न झाल्यास त्यामुळे होणाऱ्या जनक्षोभाची जबाबदारी आपली राहील असा इशारा निवेदनातून दिला आहे.

\