ओवळीयेत डांबर प्लांट उभारणीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध…

193
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुनील घाडीगावकर; आम्ही ग्रामस्थांसोबतच…

मालवण,ता.८: ओवळीये गावात डांबर प्लांट उभारणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून याबाबत ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला आहे. डांबर प्लांट पर्यावरण व आरोग्यास हानिकारक आहे. या ग्रामस्थांच्या भूमिकेसोबत आम्ही सर्वजण ठाम आहोत. अशी भुमिका येथील पंचायत समिती माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी स्पष्ट केली आहे.

ओवळीये ग्रामपंचायतच्या मागील ग्रामसभेत चर्चेत ठेवण्यात आलेल्या विषयात प्रसाद लक्ष्मण आंगणे यांना डांबर प्लांट/बॅच मिक्स प्लांट बसविण्यासाठी नाहरकत दाखला देण्याबाबतच्या अर्जाचे वाचन सभागृहात करण्यात आले. त्याच बरोबर परब टेंबवाडी/कूळकरवाडी येथील ग्रामस्थांचा विरोधाचा अर्ज ग्रामसभेसमोर वाचन करण्यात आला. दोन्ही अर्जाचे वाचन करून झाल्यावर हा प्रकल्प पर्यावरण व आरोग्यास हानीकारक असल्याने नाहरकत ग्रामपंचायतीने देवू नये असे सुचविण्यात आले. त्यानंतर प्रसाद आंगणे यांनी सभा अध्यक्ष व सचिव यांना विचारणा केली की, हा प्रकल्प पर्यावरण व आरोग्यास हानीकारक आहे हे ग्रामस्थ ठरवु शकत नाहीत तेव्हा तुम्ही सांगावे. असा प्रश्न सभागृहा समोर मांडला. त्यावर सभा अध्यक्ष व सचिव यांनी हा प्रकल्प आरोग्यास हानिकारक आहे असे आरोग्य विभाग व वरीष्ठ कार्यालय ठरवू शकतात. परंतु ग्रामस्थांचा विरोध असल्याने या प्रकल्पास नाहरकत देण्यात येवू नये असे सभागृहात बहुमताने ठरले असे स्पष्ट केले.

या प्रश्नासंदर्भात संबंधित अर्जदारांनी पंचायत समिती स्तरावर अपील केल्यानंतर त्यावर सुनावणी प्रक्रिया सूरू आहे. दोन्ही बाजू कडून याबाबत बाजू मांडली जाईल. मात्र आम्ही ग्रामस्थ यांच्या विरोधी भूमिके सोबत ठाम आहोत. डांबर प्लांटला आमचा विरोधच राहील. अशी भुमिका श्री. घाडीगावकर यांनी घेतली आहे.

परब टेंबवाडी/कूळकरवाडी या दोन्ही वाडीच्या मध्येच क्रशर आहे. त्याचा त्रास ग्रामस्थ, वस्ती तसेच पर्यावरणला होत आहे. आता त्या परिसरात डांबर प्लांट झाल्यास त्याचा अधिक त्रास ग्रामस्थ, वस्ती व पर्यावरणास होणार आहे. त्यामुळे या डांबर प्लांटला विरोध असून याला परवानगी देण्यात येऊ नये. अशी ग्रामस्थांची भुमिका असल्याचे श्री. घाडीगावकर यांनी स्पष्ट केले.

\