जुन्या झाराप-पत्रादेवी महामार्गाचे काम करताना सावंतवाडी शहरावर अन्याय

2

नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा आरोप : तात्काळ काम सुरू करा अन्यथा आंदोलन

सावंतवाडी, ता. 29 : जुना झाराप-पत्रादेवी महामार्ग डांबरीकरण करताना सार्वजनिक विभागाने शहरावर अन्याय केला आहे, असा आरोप नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला. हे काम तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारासुद्धा यावेळी त्यांनी दिला.
श्री. साळगावकर यांनी याबाबत ब्रेकींग मालवणीशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जुन्या झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. झारापपासून आकेरीपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर इन्सुलीपासून माजगावपर्यंत काम सुरू झाले. मात्र दोन्ही बाजूचे काम करताना सावंतवाडी शहरातून जाणार्‍या रस्त्याचे काम तसेच आहे. संपूर्ण रस्त्याला निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतू बांधकामच्या अधिकार्‍यांनी काम पूर्ण करताना शहरावर अन्याय केला आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. आज याबाबत मी बांधकामचे कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यावेळी संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी केली. तसेच त्यांच्याकडून सुरू असलेला प्रकार म्हणजे शहरावर अन्याय करण्यासारखे आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी काम करतो असे सांगितले आहे. परंतू पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित आहे. रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी लोकांची मागणी लक्षात घेता हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा माझा आंदोलनाचा पवित्रा राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

1

4