सावंतवाडीत दोन ठिकाणी चोरी, मुद्देमालासह सीसीटीव्ही ड्राईव्हच लंपास…

4
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बंद फ्लॅटसह कार्यालय फोडले; श्वानपथक आणून पोलिसांकडून तपास…

सावंतवाडी,ता.०९: शहरात दोन ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना घडली आहे. यात माजगाव-मेटवाडा येथील श्रीराम बोरवेल्सचे बंद कार्यालय, तर सर्वोदय नगर परिसरात बंद फ्लॅट अज्ञाताने फोडला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान एका चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही ड्राईव्हच चोरट्याने लंपास केले. त्यामुळे चोरटा सराईत असल्याचा संशय आहे. याबाबतची माहिती मिळताच दोन्ही मालकांनी आपली तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी ओरोस येथील श्वानपथक या ठिकाणी पाचारण करून चोरीचा तपास केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव-मेटवाडा परिसरात श्रीराम बोअरवेलचे कार्यालय फोडून आतील पंप फिटिंगचे सुमारे वीस ते पंचवीस हजाराचे इलेक्ट्रिक सामान चोरून नेले आहे. विशेष म्हणजे चोरट्याने सीसीटीव्हीचा ड्राईव्ह सुद्धा चोरून नेला. त्यामुळे संबंधित चोरटा सराईत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी अजित पाटील व दशरथ गावडे यांनी चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. दुसरी चोरी सर्वोदय नगर परिसरात घडली आहे. यात अज्ञाताने बंद फ्लॅट फोडला आहे. मात्र संबंधित मालक मुंबई येथे वास्तव्यास असल्यामुळे आतील चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत माहिती मिळाली नाही. दरम्यान पोलिसांनी श्वान पथक आणून दोन्ही चोऱ्यांचा तपास केला. दोन्ही चोऱ्यांमध्ये एकाचाच हात असल्याचे लक्षात येत आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करणार आहेत. तर तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके आणि पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळावर धाव घेतली.

\