विनायक राऊतांनंतर आता वैभव नाईक यांची वेळ…

582
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बबन शिंदे, राजा गावकर; विधानसभेचा महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरील हवा…

मालवण,ता.१०: लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना जागा दाखवून दिली. आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसेनेचे कुडाळ- मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे व तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघाचा उमेदवार हा धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणारा असावा अशी सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे श्री. गावकर यांनी स्पष्ट केले. सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख आशा वळपी, शहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख गीतांजली लाड, उपविभागप्रमुख भक्ती कवटकर, उदय गावडे, पराग खोत, अरुण तोडणकर, श्रीहरी खवणेकर, विशाल आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या या विजयात कुडाळ- मालवण तालुक्यातील शिवसेना आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. यापूर्वी भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवली गेली नाही. मात्र यावेळी नारायण राणे यांच्या रूपाने कोकणात भाजपचे कमळ फुलले आहे. कुडाळ- मालवण मतदार संघातून मिळालेले मताधिक्य पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून विद्यमान आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेले २८ हजाराचे मताधिक्य ३५ हजारापर्यंत कसे जाईल यादृष्टीने येत्या काळात मतदार संघात काम केले जाणार आहे.

मतदार संघात उबाठा सेनेचे वर्चस्व असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात विनायक राऊत यांना मतदार संघातील जनतेने नाकारल्याचे दिसून आले. शिवाय राऊत यांच्या विजयासाठी आमदार नाईकांनी कामच केले नसल्याचा आरोप श्री. शिंदे यांनी केला. राऊत यांना आपल्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून देण्यात आमदार नाईक हे अपयशी ठरले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही श्री. शिंदे यांनी केली. पक्षात असलेल्या अंतर्गत वादाचा फटका श्री. राऊत यांना बसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गावकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव घोषित केल्यानंतर उबाठा गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे वेगळ्याच अविर्भावात वावरत होते. त्यांना आपल्या उमेदवाराचा सहज विजय होईल असे वाटत होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर यांनी रणनीती आखत नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच राणेंचा विजय झाला. विनायक राऊत यांच्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांची वेळ आहे. त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणूकित धूळ चारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांना बबन शिंदे, राजा गावकर शिंदे गटात गेल्याने कोणताही फरक पडणार नाही असे वाटत होते. मात्र आम्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगली प्रचिती घडवून आणली. कुडाळ मालवण मतदार संघ हा शिवसेनेचा असल्याने या मतदार संघात महायुतीचा उमेदवार हा धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढविणारा असावा अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याची मागणी आम्ही वरिष्ठांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत, किरण सामंत यांनी महायुतीचे काम केले नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता श्री.गावकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराचा सामंत बंधूंकडून प्रभावी प्रचार करण्यात आला. मात्र राणे यांना या जिल्ह्यातून मताधिक्य न मिळण्याची अन्य कारणे आहेत. यात विरोधकांकडून झालेला अपप्रचार हे प्रमुख कारण आहे. या अपप्रचाराला रत्नागिरीतील जनता बळी पडल्याने राणेंचे मताधिक्य घटल्याचे श्री. गावकर यांनी स्पष्ट केले.

\