बांद्यात पुर परिस्थिती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करा…

58
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ग्रामस्थांची मागणी; सावंतवाडी तहसीलदारांचे वेधले लक्ष…

बांदा,ता.१३: येथील बाजारपेठ बुडीतक्षेत्रात येत असल्याने ग्रामस्थ तसेच व्यवसायिकांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात यावा, अशी मागणी आज बांदा ग्रामस्थांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, गुरु कल्याणकर, निलेश उर्फ पापु कदम, गुरुनाथ सावंत आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, बांदा हे बुडीतक्षेत्रात येत असल्याने पावसाळ्यात कायम येथील व्यवसायिकांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यामुळे बांद्यातील व्यापारी वर्ग, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. महाराष्ट्र शासनाच्या नद्यांमधील गाळ उपसा करण्याबाबतच्या धोरणानुसार, तेरेखोल नदीतील गाळ, वाळू मुळे निर्माण झालेली बेटे, राडा-रोडा बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर व क्षेत्रात कंत्राटे देण्यात आली व काम देखील सुरू झाले. परंतु बांदा तेरेखोल नदी क्षेत्रातील गाळ उपसा करण्यात आला नाही. तो वेळीच काढण्यात आला असता तर, बऱ्याच अंशी होणारे संभाव्य नुकसान टाळता आले असते.
आता गाळ काढणे शक्य नसल्यास अजून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नसल्याने, किमान तातडीने बांद्यातील नदीपात्रात मिळणाऱ्या सर्व ओहोळांमध्ये तयार झालेली बेटे, माती, दगड-धोंडे काढून ओहोळ स्वच्छ करण्यात यावेत. तसेच ओहोळ जेथे नदीला मिळतात, तेथील गाळ काढल्यास पाणी वाहून जाण्यास सोपे होईल व नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल. तरी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी तहसीलदार श्री. पाटील यांनी या बाबतचा अहवाल आपण तातडीने जिल्हाधिकारी यांना पाठवतो व याबाबत तत्परतेने पाठपुरावा करून कार्यवाही करतो, असे आश्वासन दिले.

\