वीरपत्नी राजगेंच्या वाढदिवसासाठी सुरेश प्रभूंची प्रमुख उपस्थिती…

172
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: भारत-पाक युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीद हवालदार बाबली राजगे यांच्या वीरपत्नी सरस्वती राजगे यांचा वाढदिवस सोहळा १ जुलैला होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि युवराज लखमराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. राजगे यांचा ८८ वा वाढदिवस श्री. पंचम खेमराज मध्ये होणार आहे.
यावर्षी भारत पाकिस्तानच्या युद्धाला ६० वर्षे, आणि कारगिल युद्धाच्या विजयाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शहीद हवालदार बाबली राजगे यांना २३ सप्टेंबर १९६५ च्या भारत-पाक युद्धाप्रसंगी वीरगती प्राप्त झाली. तर त्यांच्या पत्नीचा वाढदिवस त्याच दिवशी साजरा होत आहे. या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने, विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशनने सिंधुदुर्गातील एनसीसी आणि एन.एस.एस सोबत सैनिक कल्याण विभागाच्या सहकार्याने आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या पुढाकाराने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरूवात ‘एनीबडी कॅन सिंग’ या संकल्पनेच्या निर्मात्या आणि देणगीदार गायिका मानसी केळकर-तांबे यांच्या सुश्राव्य गीतगायनाने होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्या आणि विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशन व्हीडीसीएफ च्या सचिव डॉ. भाविता चव्हाण या फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती देतील. यानंतर जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी नामनिर्देशन झाल्याबद्दल मोहन होडावडेकर यांचा सत्कार होईल. प्रमुख अभ्यागत कर्नल दीपक दयाळ यांचे मनोगत व्यक्त होईल. यानंतर वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी शुभेच्छासंदेश देण्यास मान्यता दिली आहे.
या उपक्रमास ‘मेट्रोवुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरिष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी संस्थेच्या संवर्धक या नात्याने विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य दिलीप भारमल, एनसीसी चे कर्नल दीपक दयाळ, एन एस एस चे वसीम सय्यद यांचे विशेष योगदान आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी केले आहे.