“थर्टीफर्स्ट” च्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा…

198
2
Google search engine
Google search engine
Google search engine

हिंदू जनजागृती समितीची वेंगुर्ले पोलिस निरीक्षकांकडे मागणी…

वेंगुर्ला ता.२२: येत्या ३१ डिसेंबर या दिवशी रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पार्ट्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे,असे गैरप्रकार होतात. तरी पोलिसांनी या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करून सुसंस्कृत आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे. समिती सार्वजनिक उत्सव आणि इतर कार्यक्रमांत होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल उदा. राष्ट्रध्वज राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हे यांची विटंबना रोखणे, फटाक्यांद्रारे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच देवतांची विटंबना थांबवणे अशा विविध विषयांमध्ये गेली १८ वर्षे जनजागृती करत आहे. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना साहाय्यही करत आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणाऱ्या युवापिढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. अनेक तज्ञ कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात फटाके फोडल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढून श्वसनाचे त्रास वाढतात. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही.तरी आपण योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे. समितीचे महेश जुवलेकर, चंद्रकांत ठाकूर, गोपाळ जुवलेकर, योगिता जुवलेकर, दाजी नाईक, प्रविण कांदळकर यांनी हे निवेदन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांना दिले आहे.

\