महसूल यंत्रणा आणखी किती कोतवालांचे बळी घेणार?…

277
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची संघटनेची मागणी…

कणकवली, ता.२२ : डेगवे-डिंगणे कोतवाल संतोष नाईक यांची आत्महत्या ही त्यांना झालेल्या मानसिक त्रासाच्या अस्वस्थेतून झालेली आहे. अनधिकृत माती उत्खनन प्रक्रियेची कार्यवाही करण्यास मंडळ अधिकार्‍यांसमवेत सहभाग घेतल्याने माती उत्खनन करणार्‍या व्यक्तीने संतोष नाईक यांच्या घरी येऊन तक्रार त्यांनीच केली असा समज करून घेऊन त्यांच्या कुटुंबासमोर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते अस्वस्थ होते असा जबाब त्यांच्या मुलीने दिला आहे. ही बाब गंभीर असून अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असताना जिल्ह्यातील कोतवालांना काम करणे कठीण होत आहे. या घटनेची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा कोतवाल असोसिएशनने केली आहे.
याबाबत सखोल चौकशी होऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, कोतवाल संतोष नाईक यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आत्महत्याग्रस्त नाईक कुटुंबियांना भरपाई म्हणून 10 लाख रू. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. श्री नाईक यांच्या वारसापैकी एकाला त्यांच्या जागी नियुक्ती द्यावी, कोतवालांवर होणारे अन्याय बंद करावेत, तालुक्याच्या ठिकाणी वेळीअवेळी फोनवरून बोलावून त्यांना कामाला लावणे, कुणी आला नाही तर नोटीस काढून कामावरून काढू अशी धमक्या देणे, रात्रपाळी, नैसर्गिक आपत्ती ड्युटी, अनधिकृत उत्खनन सर्व्हे अशा प्रकारची कामे कोतवालांकडून जबरदस्तीने करून घेतली जातात. प्रत्यक्षात अशी कामे करताना काही वाईट घटना घडली तर त्याबाबत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ कोतवालांना मिळत नाही.तरी अशाप्रकारची जोखमीची कामे कोतवालांकडून करून घेताना त्यांना शासकीय संरक्षण देण्याची गरज आहे असे या निवेदनात कोतवाल संघटनेने म्हटले आहे.

\