पंतप्रधान संवेदनशील, गुजरातप्रमाणे ते महाराष्ट्राच्या मागे उभे राहतील…

31
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उद्धव ठाकरे ; पंचनाम्याच्या अहवाल आल्यानंतर येत्या दोन दिवसात मदत जाहीर करू…

मालवण, ता. २१ : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाच्या निकषानुसार तत्काळ मदतीचे आदेश आपण यापूर्वीच दिलेले आहेत. याचबरोबर एकूण आढावा घेतल्यानंतर आणखीनही मदत उपलब्ध करून दिली जाईल. पंतप्रधानही संवेदनशील आहेत तेही योग्य ती मदत करतील. आम्ही राज्य म्हणून जे जे करता येईल ते सर्व करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कोकण आणि शिवसेना हे नाते घट्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात पडझड व नुकसान झालेल्या तालुक्याला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दुपारी भेट दिली. शहर व किनारपट्टीवरील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व लोकप्रतिनिधींकडून त्यांनी आढावा घेतला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, कामगार नेते गुरूनाथ खोत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, सुशांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. ठाकरे म्हणाले, तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा किनारपट्टी भागास बसला. यात प्राणहानीही झाली. आंबा, काजू झाडांचे, घरांचे तसेच मच्छीमार बांधवांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची भरपाई ही केली जाईलच. मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. याबाबत पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले आहे. हवामानातील बदलांमुळे सातत्याने वादळे होत आहेत. गेली दोन, तीन वर्षे वादळांचा धोका अनुभवत आहोत. अशी वादळे यापूर्वी येथील किनारपट्टीवर नव्हती. आता ती यायला लागली आहेत. वादळांमुळे नुकसान होत असल्याने जो कायमस्वरूपी आराखडा बनविला आहे तो पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मंजूरी किंवा आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा. भूमिगत वीजवाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारा यासारख्या गोष्टी या कायमस्वरूपी करणे गरजेचे बनले आहे. वादळाचा वेग, तीव्रता कमी करू शकत नाही. त्यामुळे नुकसान कमी कसे होईल यादृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जातील. पंचनाम्याचा येत्या दोन दिवसात अंतिम अहवाल मिळाल्यानंतर योग्य ती मदत जाहीर केली जाईल. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत एटीआरएफ आणि एनडीआरएफचे जे निकष आहेत ते जुने झाले आहेत हे निकष बदलण्याची गरज आहे. ही मदतही जास्त झाली पाहिजे याबाबत लक्ष वेधले आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात जास्त मदत केली होती. नुसत्या पॅकेजवर माझा भरोसा नाही. नुकसानीचा जो अहवाल येईल. त्यानुसार निकष ठरवून मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान संवेदनशील आहेत. ते जसे गुजरातच्या मागे उभे राहिले तसेच ते महाराष्ट्राच्या मागे उभे राहतील. मी विरोधी पक्षनेता नाही तसेच मी वैफल्यग्रस्त नाही असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लगावला. राज्य शासनाकडून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. मात्र केवळ मदत न करता जी कामे कायमस्वरूपी करणे गरजेचे आहे ती करण्यावर आपला भर राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

\