कुडाळ एसटी आगार मे महिन्यात तब्बल ५७ लाखाला तोट्यात…

1209
2
Google search engine
Google search engine

आगार व्यवस्थापकांकडून नोटीस; कर्मचाऱ्यांचे मात्र अधिकाऱ्यांकडे बोट…

कुडाळ/निलेश जोशी,ता.२४: नियोजन शून्य कारभारामुळे कुडाळ एसटी आगार मे महिन्यात तब्बल ५७ लाख ६३ हजार रुपयांसाठी तोट्यात आले आहे. याबाबतची माहिती आगार व्यवस्थापकांनी लावलेल्या नोटिशीमुळे उघड झाली आहे. परंतु या प्रकाराला चालक वाहकांपेक्षा एसटीचे अधिकारी दोषी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.किलोमीटर पूर्ण करण्याच्या टार्गेट मध्ये तसेच अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे हा प्रकार निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे. असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

एकंदरीत्या या मागच्या कारणांचा अभ्यास करता, अनेक गोष्टी पुढे येत आहेत. डेपो मध्ये गाड्यांची कमतरता, किलोमीटरमध्ये दरवर्षी वाढ, चालक वाहक यांची कमतरता, गरज नसताना वाहतूक निरीक्षक तसेच क्लार्कच्या जागेवर चालक वाहक यांना वापरल्यामुळे ही कमतरता अधिक जाणवते. परिणामी डबल ड्युटी लावावी लागते. त्यामुळे अतिकलिक भत्त्यात वाढ होते. आगारात जाणूनबुजून मंजूर क्लार्कचा परिपूर्ण वापर न करता मंजूर नसलेल्या ठिकाणी क्लार्क नेमून काही जाणूनबुजून क्लार्क कमतरता दाखवून चालक वाहकांचा तसेच वाहतूक नियंत्रकांचा वापर करणे, गाड्या कमी असल्याने नियोजित वेळेत गाडी मिळत नाही, तसेच चालक वाहक डबल ड्युटी असेल तर नियोजित वेळेत फेरी जात नाही. गाडी उशिरा मिळाली तरी चालक वाहकाने कर्तव्य पार पाडून किलोमीटर पूर्ण करण्याकरिता गरज नसतानाही एका मागून एक अशा पाठोपाठ गाड्या पाठवणे. चालक वाहक पगार घेतात त्यामुळे त्यांच्याकडून किलोमिटर सर्व पूर्ण करून घ्यायलाच हवेत अशी सक्ती. त्यामुळे एकाच मार्गावर २ ते ३ गाड्या एकामागून एक धावत असतात. परिणामी गाड्या रिकामी धावतात.

त्याचबरोबर प्रवाशी नसतील तर अशावेळी किलोमीटर पूर्ण करण्याकरिता एकाच वेळी दोन गाड्या पाठवू नयेत अशा सक्त सूचना असतानाही उत्पन्न नाही मिळाले तरी चालेल पण किलोमिटर पूर्ण झाले पाहिजेत. अशी अधिकाऱ्यांची कामगारांवर मुजोरगिरी केली जाते अशाही तक्रारी आहेत. तसेच चालक वाहक यांच्यावर विश्वास न दाखवता प्रवाशांनी केलेल्या खोट्या तक्रारी घेऊन कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते. चालक वाहक हे माणूस आहेत, त्यांना तहानभूक, नैसर्गिक विधी अश्या मूलभूत गरजा आहेत, ह्या गोष्टीचा कोणताही विचार न करता एखाद्या जनावरांप्रमाणे त्याची पिळवणूक करून घेण्याचा प्रकार अधिकाऱ्यांकडून होत असल्याची देखील माहिती पुढे येत आहे. चालक वाहक यांची ड्युटी साधारणतः दुपारी दीड ते दोन वाजता संपते तरी त्याला दुपारी १२ ते १२.३० वाजता चालू होणाऱ्या ड्युटीला रीबुक केले जाते. परिणामी फेऱ्या उशिरा जातात. आणि या सगळ्याचा परिणाम डेपोच्या उत्पन्नावर होत आहे.

नियमबाह्य वेळापत्रक,अवास्तव केलेली किलोमिटर वाढ आणि त्यामुळे कर्मचाऱ्यावर येणार ताण याचा कोणताही अधिकारी माणूस म्हणून विचार करत नाही. तसेच लाईन चेकिंगच्या अधिकाऱ्यांची सतत टांगती तलवार असतेच. कधी कोणती केस ठोकतील याचा नेम नाही अशी कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण झालेली भीती. वरील सर्व मुद्यांचा विचार करता या सगळ्याला फक्त अधिकारीच कारणीभूत असून ते स्वतः खूप काम करतात आणि चालक वाहक बसून पगार घेतात असा सूर वाहक-चालकातून उमटत असलयाचे कानी येते आहे. परिणामी अशा नियोजन शून्य कारभारामुळे कुडाळ आगारचा माहे मे २०२४ चा तोटा ५७ लाख ६३ हजार ४३५ रुपये एवढा झाल्याचे स्वतः अधिकारीच मान्य करताहेत हीच कुडाळ आगाराची खरी शोकांतिका आहे. दरम्यान झालेला तोटा का झाला, याची कारणमीमांसा करून महामंडळात वरिष्ठ पदाधिकारी यावर काय निर्णय घेतात हे बघणे आवश्यक आहे. महामंडळाच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.