महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपययोजना करा…

53
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संदेश पारकर; विविध प्रश्नांबाबत प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा…

कणकवली ता.२० : मुंबई-गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी उपयायोजना कराव्यात. हायवे अपघातांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्यांना ‘तौक्ते, निसर्ग’प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, धरणग्रस्तांना शासनाच्या निकषांप्रमाणे मोबदला मिळावा यासह तालुक्यातील अन्य प्रश्न व समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ही असंवेदनशील झाली आहे. संबंधित यंत्रणा वेळीच संवेदनशील न झाल्यास जनतेचा उद्रेक होईल, असा इशाराही पारकर यांनी दिला. तसेच प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या सर्व विभागांच्या प्रमुखांची एकत्र बैठक घेऊन तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न व समस्यांवर लवकरच तोडगा काढावा, अशी सूचना पारकर यांनी केली. तर आपली कैफियत व जनतेच्या मागण्यांचा विचार करून लवकरच तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कातकर दिले.
या भेटी दरम्यान तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांंताधिकाऱ्यांना दिले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण वरुणकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, सोमा घाडीगावकर, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, प्रतीक्षा अवसरे, सचिन आचरेकर, रुपेश आमडोसकर, राजू शेट्ये,भालचंद्र दळवी, विलास गुडेकर, सिध्देश रावराणे, प्रतीक रावराणे, विशाल राणे, संजय हिर्लेकर, स्वप्नील धुरी, देवेंद्र पिळणकर यांच्यासह मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली येथे मागील काही दिवसात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यांंच्या मृत्यूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारणीभूत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. याशिवाय हायवेवरील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकसान भरपाई दिली. त्याचप्रमाणे जानवली येथील अपघातांमध्ये मृत पावलेल्या जाधव, कदम यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी पारकर यांनी केली. कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तौक्ते व निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना शासनाने ज्याप्रमाणे मदत केली होती, त्याचप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील हरकुळ बु., शिवडाव, हळवल, कळसुली अन्य भागात अनेक विद्युत पोल व विद्युत तारा पडल्या. परिणामी त्याठिकाणाचा अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. पोल उभे करणे व विद्युत तारा नव्याने ओढण्यासाठी महावितरणकडे अपुरे मनुष्यबळ आहे, ते मनुष्यबळ वाढून ज्या गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला तो पूर्ववत करण्यात यावा. तालुक्यातील धरणाची कामे सुरु आहे. मात्र, धरणासाठी जमिन दिलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदला दिलेला नाही, तो देण्यात यावा. पावसाळा लांबला तर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, ही शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. वारस तपासणीचे काम त्वरित होण्याकरिता यंत्रणा सक्षम करण्यात यावी, अश्या मागण्या करण्यात आल्या. तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणांवर सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव असल्याचा यावेळी आरोप पारकर व सावंत यांनी केला. तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या रिक्त जागा भरण्याबाबत प्रतीक्षा अवसरे यांनी प्रांताधिकारी यांचे लक्ष वेधले. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेमधील सर्व विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, या अभावामुळे प्रश्न व समस्या मार्गी लागण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय रहावा, करिता सर्व विभागांच्या प्रमुख प्रांताधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, अशी सूचना शिष्टमंडळाने केली. या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे कातकर यांनी सांगितले.

\