गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अर्धवट, ठेकेदारावर कारवाई करा…

101
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नरेंद्र कोलते; दुरुस्तीच्या नावाखाली आणखी किती दिवस घाट बंद ठेवणार…?

वैभववाडी,ता.२४: गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाकडे केली आहे. दुरूस्तीच्या नावावर ५ महिने करूळ घाट वाहतुकीसाठी बंद असून त्याचा फटका वाहनधारकांसह स्थानिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा पावसाळ्यात पुन्हा फटका सहन करावा लागणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे. यात असे म्हटले आहे की, तळेरे-गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल २४८ कोटी निधी मंजूर आहे. महामार्ग कॉंक्रिटीकरण कामाला डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. करुळ नदी वरील पुलाच्या कामाला पाच महिने झाले आहेत. तरी देखील काम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. पर्यायी मार्ग नदीतून काढण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास नदीतून सुरू असलेला प्रवास बंद होणार आहे. पुलाचे काम सुरू असल्याने गेले पाच महिने सुरू असलेल्या पर्यायी मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

तसेच मार्गावर ठिकठिकाणी काॅजवे बांधण्यात आले आहेत. परंतु काॅजवेंची कामे निकृष्ट झाली आहेत व दरम्यानच्या काळात पाणी न मारल्याने काॅजवेंच्या कठड्यांना भेगा पडल्या आहेत. करुळ चेक नाका ते घाटपायथा दरम्यान करण्यात आलेल्या काँक्रिटिकरण कामाला देखील काही ठिकाणी तडे गेले आहेत. खडकवाडी रस्त्या नजीक महामार्गाची उंची वाढल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दिंडवणे, भट्टीवाडी व खडकवाडी पर्यंत येणाऱ्या नदीपात्रात रस्त्यावरील दगड माती टाकण्यात आली आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलण्याची दाट शक्यता आहे. दगड माती तात्काळ काढण्यात यावी. काही ठिकाणी जमीन मालकांना कोणतीही कल्पना न देता माती उत्खनन करण्यात आलेले आहे. कार्यकारी अभियंता व जिल्हा प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी श्री कोलते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

\