महसूलच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अवैध उत्खनन वाहतूक सुरू…

129
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परशुराम उपरकर; अन्यथा न्यायालयात जावे लागेल, तहसीलदारांना इशारा…

सावंतवाडी,ता.०३: तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोली घाटातून होणारी अवजड वाहतूक, इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी या अनधिकृत प्रकारामागे सावंतवाडी महसूल विभागाचा हात आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. दरम्यान याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागू, असा इशारा त्यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे. श्री. उपरकर यांनी नुकतीच तहसीलदार पाटील यांची भेट घेऊन याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, मंदार नाईक, विजय जांभळे, प्रवीण गवस, सुरेंद्र कोठावळे, आबा चिपकर, नंदू परब, सुनील नाईक, संदेश सावंत, स्वप्नील जाधव, ज्ञानेश्वर नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी उपरकर यांनी महसूल विभागला लक्ष करताना सावंतवाडी तालुक्यात शासनाचे नियम डावलून बरेच गैर प्रकार होत आहेत. त्यावर महसून विभागाचा अंकुश नाही. ओव्हरलोड वाहतूक प्रश्नी कारवाई करण्याचा दिखावा करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करुन तहसीलदार यांनी किती महसूल शासनास मिळवून दिला हे पुराव्यांसहीत सादर करावे. आंबोली घाट अवजड वाहतूकीसाठी बंद असून देखील पोलीस व महसूल प्रशासन आरटीओ विभागाच्या आशिर्वादाने खुलेआम रात्रीच्या वेळी वाहतूक सुरु आहे. त्यावर प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी काय कारवाई केली? असा प्रश्न उपरकर यांनी केला. पडवे माजगाव इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात अनधिकृत मायनिंग उत्खनन झाले. त्यावर प्रांत, तहसिलदार महसूल प्रशासनाने कोणती दंडात्मक कारवाई केली. हे मायनिंग अनधिकृतरित्या दोडामार्ग

तालुक्यात डंप करुन रेडीपोर्ट पर्यंत पोहोचवले गेले. या सर्व गैर प्रकाराला महसूल प्रशासनाचा आशिर्वाद होता तर त्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या दिड हजार डंपरवर कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली? सावंतवाडी तालुक्यात अनधिकृत चिरेखाणी, कॉरी सुरु आहेत त्यावर आत्तापर्यंत तहसीलदार यांनी किती दंडात्मक कारवाई केली? असा प्रश्न उपरकर यांनी केला. चिरेखाणी यांची तपासणी करुन दिलेल्या पास पेक्षा जास्त खोल उत्खनन सुरु आहे. विनापास वाहतूक सुरु आहे. त्याबाबत तहसिलदार यांनी पथक नेमले होते? त्या कारवाईचे काय झाले? तालुक्यातील मळेवाड, कोंडुरे, धाकोरे, आजगाव, तळवणे भागात अनधिकृत चिरे उत्खनाबाबत ग्रामस्थांच्या तक्ररी आल्या आहेत. त्यावर महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या खाणीवर कारवाई न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना व जबाबदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेवून खाणीच्या ठिकाणी धडक देवू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी अवजड, ओव्हरलोड, सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत चिरे खाणे व बिन पास वाहतुकीबाबत तलाठी यांचे पथक नेमून कारवाई केली जाईल. अनधिकृत कॉरी, खाणी यांना भेटी देवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार. पडवे माजगाव अनधिकृत उत्खनाबाबत लक्ष घालून कारवाई केली जाईल. आंबोली येथे २४ तास पथक नेमून कारवाई केली जाईल. तालुक्यातील प्रशासनाच्या व्यस्त कामामुळे कारवाई संदर्भात लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यावर श्री उपरकर यांनी आपले इतर कर्मचारी काय करतात? असा सवाल तहसीलदार पाटील यांना केला. मात्र आता कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल असे आश्वासन तहसिलदार पाटील यांनी श्री उपरकर व उपस्थितांना दिला. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी फक्त प्रशासकीय काम करण्यासाठी महसूल विभाग नाही जिथे शासनाचा महसूल बुडत तिथेही लक्ष घालून प्रांत तहसिलदार यांनी दंडात्मक कारवाई करुन शासनाला जास्त महसूल उपलब्ध करुन दिला पाहिजे, असे खडेबोल सुनावले.

\