वीज समस्यांबाबत महावितरणाला निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष…

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सोनिया सावंत; कुणकेरीत वीज ग्राहक संघटनेची विभागीय बैठक संपन्न…

सावंतवाडी,ता.०३: कुणकेरी गावातील वीज समस्यांबाबत महावितरणाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देऊन सुद्धा महावितरणकडून याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावातील वीजेच्या समस्या सोडवणे कठीण होत आहे. अशी खंत कुणकेरी सरपंच सोनिया सावंत यांनी व्यक्त केली आहे. कुणकेरी येथे वीज ग्राहक संघटना सावंतवाडी आयोजित विभागीय बैठकीत महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत सरपंच, उपसरपंचांसह वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी गावात उद्भवणाऱ्या वीजेसंबंधित अनेक समस्यांवर चर्चा करून वीज ग्राहक संघटनेकडून ग्राहकांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, उपसरपंच सुनील परब आदी उपस्थित होते.

गावातील मुख्य चौकातील ट्रान्सफॉर्मर वर वेलींचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी विद्युत खांब वेली आणि झाडांनी वेढलेले आहेत. झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर आडव्या लटकत असून भर पावसाळ्यात झाडे पडून वीज पुरवठा दीर्घ काळ खंडित होण्याची शक्यता असल्याने गावातील लघु उद्योग, गणपती शाळा आदींचे काम रखडून नुकसान होण्याची भीती उपसरपंच सुनील परब यांनी व्यक्त केली. सोनिया सावंत यांनी गावात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने महावितरण कार्यालयात निवेदन देऊनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज घाटकर यांनी देखील मान्सून पूर्व झाडे साफसफाई करण्यासंबंधी अर्ज देऊन उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करून देखील केवळ आश्वासने दिली जातात परंतु काम करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कुणकेरी गावासाठी दिलेला कंत्राटी वायरमन हा निरवडे, आरोस परिसरातील असल्याने गावात विजेची समस्या निर्माण झाल्यावर गावाला कोणीच वाली उरत नसल्याने गाव बऱ्याचदा अंधारात असतो. गावासाठी नेममुन दिलेला वायरमन व अभियंता मोरे हे कधीच फोन स्वीकारत नसल्याची तक्रार अनेक वीज ग्राहकांनी केली, त्याचबरोबर गावासाठी दिलेला वायरमन हा गावापासून २५ ते ३० किलोमीटर लांब राहत असल्याने गावासाठी जवळ राहणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. गावात दोन ट्रान्सफॉर्मर असून एक १०० केव्ही तर दुसरा ६३ केव्हीचा असल्याने वीज पुरवठा कमी दाबाने होतो. शेत बागेत मोटार पंप सुरू केला की घरांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने कमी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बदलून १०० केव्ही चा ट्रान्सफॉर्मर बसविणे व गावासाठी आणखी एक नवा ट्रान्सफॉर्मर मंजूर करावा.

गावात येणारी वीज जोडणी जंगलातून येत असल्याने अनेकदा वीज खंडित होते. त्यामुळे गावाच्या हमरस्त्याने वीज खांब घालून मिळावेत, जेणेकरून ग्रामपंचायतीचे विजेचे बल्ब लावणे सोयीचे होईल. दिवसभर वीज ये जा करत असल्याने योग्य ती उपाययोजना करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

बैठकीच्या सुरुवातीस वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी प्रास्ताविक करून वीज ग्राहक संघटनेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर यांनी महावितरणच्या कारभाराविषयी माहिती देत भविष्यात प्रीपेड मीटर ग्राहकांवर लादले जातील त्याचे दुष्परिणाम सांगून प्रीपेड मीटर लावण्यासाठी विरोध करा असे सुचविले. त्याचप्रमाणे महावितरणने मान्सून पूर्व कोणकोणती कामे करावयाची आहेत याची सविस्तर माहिती दिली व ती आपल्या गावात केलीत का? असा प्रश्न उपस्थित करून उपकार्यकारी अभियंता कार्यालय सावंतवाडी येथे मान्सून पूर्व कामे पूर्ण करून मिळण्यासाठी तात्काळ महावितरण कार्यालय सावंतवाडी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे मागणी अर्ज करण्याचे सुचविले आणि त्याची प्रत वीज ग्राहक संघटनेला द्यावी असे सांगितले. तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर यांनी महावितरण कडून कशाप्रकारे ग्राहकांची लुबाडणूक होते याविषयी मार्गदर्शन करून प्रीपेड मीटर रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष प्रतापराव होगडे यांच्याकडून उपलब्ध झालेल्या अर्जांचे वाटप केले. ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी संघटनेचे कार्य आणि संघटना का स्थापन झाली हे विषद करून कशाप्रकारे अन्यायाविरुद्ध उभे राहायचे व आपले हक्क मिळवायचे, कोणत्या अधिकाऱ्याकडे कुठले अर्ज करायचे, ऑनलाईन तक्रार कुठे नोंदवायची या बद्दल सविस्तर माहिती देत. महावितरणला दिलेल्या अर्जाची प्रत संघटनेकडे सुद्धा द्या, म्हणजे संघटना देखील त्या अर्जाचा पाठपुरावा करेल. कोणतीही अडचण असेल तर वीज ग्राहक संघटनेकडे संपर्क साधा असे आवाहन केले.

यावेळी अनेक ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या व संघटनेच्या माध्यमातून त्या सोडविण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली. उपसरपंच सुनील परब यांनी संघटना वीज ग्राहकांच्या भल्यासाठी काम करत असल्याने आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहूया असे आवाहन वीज ग्राहक ग्रामस्थांना केले. सरपंच सोनिया सावंत यांनी वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी गावात येऊन अनमोल मार्गदर्शन केल्याने संघटना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कुणकेरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज घाटकर यांची उपसरपंच सुनील परब यांच्या सुचनेनुसार यावेळी वीज ग्राहक संघटनेच्या सदस्यपदी निवडण्यात आले.

यावेळी माधुरी मेस्त्री, भगवान सावंत, जितेश कुणकेरकर, ज्येष्ठ नागरिक मंगेश सावंत, माजी सरपंच विश्राम सावंत, विनायक गावडे, मनसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, कैलास परब, मनोज घाटकर, सारिका चव्हाण, सुजाता मेस्त्री, माजी सरपंच शशिकांत सावंत आदी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\