गाडीसमोर खडी ओतून तहसीलदारांना रोखण्याचा प्रयत्न…

527
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; गोव्यातील डंपर चालकाकडून प्रकार, गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.२६: खुद्द तहसीलदारांच्या गाडीसमोर चालत्या डंपर मधील खडी ओतून महसूल पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रकार करणाऱ्या गोवा येथिल अज्ञात डंपर चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मळगाव-कुंभार्ली येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडली. याप्रकरणी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडीचे तहसीलदार श्री. पाटील व त्यांचे सहकारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी झाराप पत्रादेवी महामार्गावर तपासणी करत होते. यावेळी त्या ठिकाणाहून येणाऱ्या गोवा पासिंगच्या एका डंपर चालकाची हालचाल संशयास्पद दिसली. यावेळी त्यांनी त्या डंपर चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र तो वाहन न थांबवता गोव्याच्या दिशेने पळून जाऊ लागला. यावेळी पथकाला अधिक संशय आल्यामुळे त्यांनी डंपरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र मळगाव कुंभार्ली परिसरात त्याने आपल्या डंपर मधील माती अचानक रस्त्यावर ओतली. यावेळी अचानक हा प्रकार पाहून महसूल पथक थांबले ही संधी साधून तो गाडी घेऊन पळून जाण्यास यशस्वी झाला. याप्रकरणी खुद्द तहसीलदारांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\