जनसेवेसाठी खिशातून पैसे खर्च करण्याची राणेंसारखी दानत असावी लागते…

228
2
Google search engine
Google search engine

बाबा परब ; ठाकरे गटाकडे दानत नसल्यानेच त्यांना मिरच्या झोंबल्या…

मालवण, ता. २८ : जनसेवेसाठी खिशातून पैसे खर्च करण्यासाठी निलेश राणे यांच्यासारखी दानत असावी लागते. ठाकरे गटाकडे ही दानतच नसल्याने राणेंचे विकासकार्य व जनतेचा मिळणारा पाठिंबा बघून त्यांना मिरच्या झोंबत असल्याची टीका जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्यावर खासदार नारायण राणे यांचे संस्कार आहेत. जनसेवा हे व्रत मानून राणे कुटुंब जनतेची सेवा करत असतात. जनतेला आपले कुटुंब मानतात. याच भावनेतून काम करत असताना जनतेचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत ही त्यांची तळमळ नेहमीच अनेक सेवाकार्यातुन दिसून येते.

तालुक्यातील कांदळगाव येथील शाळेचे छप्पर कोसळून नुकसान झाले. प्रशासन पातळीवर कार्यवाही सूरू झाली. मात्र शासकीय कामांना एक प्रक्रिया असते. त्याला काही कालावधी जातोच. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भाजपा नेते निलेश राणे यांनी तात्काळ स्वखर्चाने शाळा दुरुस्तीचा निर्णय घेतला. जनहिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थ पालक यांनी स्वागत करत निलेश राणे यांचे आभार मानले. यामुळे उबाठा गटाला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून पोपटपंची सूरू झाली आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाचा निधी मिळत नाही वगैरे टिपण्णी केली जात आहे. अपयशी नेते आणि बालिश पदाधिकारी अशी अवस्था असलेल्या ठाकरे गटाकडून अशा टीका टिपण्णी शिवाय दुसरी अपेक्षा नाही.

मागील दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे खासदार राहिलेले विनायक राऊत शासकीय स्वरूपात मिळणारा खासदार निधीही पुर्ण खर्ची करू शकले नाहीत. जनतेत कोणताही संपर्क त्यांचा नव्हता. कोणतेही विकासकाम त्यांनी केले नाही. त्यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. हक्काचे खासदार म्हणून नारायण राणे यांना जनतेने विजयी केले. आता विधानसभा निवडणुकीची वाट जनता पाहत आहे. दहा वर्ष अपयशी ठरलेल्या आमदार नाईक यांनाही जनता जागा दाखवून देणार आहे. भाजप नेते निलेश राणे यांना जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे. हे सर्व चित्र समोर दिसत असल्याने ठाकरे गट पदाधिकारी अस्वस्थ झाले असून पोपटपंची करत आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा भावनेतून व विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असलेल्या निलेश राणे यांच्या पाठीशी जनता ठाम आहे. जनतेतून मिळणारी कौतुकाची थाप, आशीर्वाद हेच महत्वाचे असून निलेश राणे यांचे सेवाकार्य असेच चालू राहील.

भाजपायुती सरकारच्या माध्यमातून खासदार राणे यांच्या मार्गदर्शनात व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने मालवण कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे कटीबद्ध आहेत. गेल्या दहा वर्षात भूल थापा, आरोप प्रत्यारोप आणि जनतेला भडकवून केवळ विरोधाचे राजकारण वैभव नाईक यांनी केले. आता जनताच त्यांना कंटाळली आहे. असे सांगून बाबा परब म्हणाले, शासन निधीतून सर्वत्र पायाभूत विकास होत असतो. मात्र त्या पलीकडे जनहिताच्या दृष्टीने व्यापक विकासकाम करण्यात वैभव नाईक अपयशीच ठरले. गेल्या दहा वर्षात वैभव नाईक यांनी स्वखर्चातूनही कोणतेही विकासकाम केले नाही. जर केले असेल तर पोपटपंची करणाऱ्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावे असे खुले आव्हान आहे.