खवणे येथे अज्ञाताने जाळली होडी व जाळी….

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पावणे पाच लाख रुपयांचे नुकसान : निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वेंगुर्ले, ता.२३: तालुक्यातील खवणे खालचीवाडी येथील दिगंबर एकनाथ सारंग यांच्या मालकीच्या मच्छीमारी होडीला आग लागून सुमारे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान खवणे बीच येथे असलेल्या होडिला हि आग कुणीतरी अज्ञाताने लावल्याची तक्रार श्री. सारंग यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निवती पोलीस ठाण्यात श्री. सारंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, IND-MH-५- NM-५३० असा रजिस्टर नंबर असलेली आपली जलवंती नावाची रापणीची परवानाधारक होडी होती. होडीने रापणीच्या जाळीने समुद्रात मासेमारी करतो व उदरनिर्वाह चालवतो. काल २२ सप्टेंबर रोजी भाऊ, शेजारी असे मिळून खवणे बीच येथे होडीनजीक रात्री ०९.३० वाजेपर्यंत जाळ्या सोडविण्याचे काम करत होतो. नंतर आम्ही जेवण करणेकरीता घरी निघुन आलो. जेवण झाल्यावर रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास मला वाडीतील लोकांचा आरडा ओरड केल्याचा आवाज ऐकू आला. म्हणून मी घरातून बाहेर आलो तेव्हा मला आम्ही लावलेल्या बोटीच्या ठिकाणी लालसर रंगाचा मोठा प्रकाश दिसु लागला. म्हणून मी तसेच माझे भाऊ व इतर शेजारी त्या ठिकाणी जावून पाहीले असता त्या ठिकाणी आमचे होडीला तसेच होडीतील जाळयांना आग लागल्याची दिसली. त्यावेळी माझी पक्की खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने माझे होडीचे व जाळयांचे आग घालून नुकसान केलेले आहे. सदरची आग आम्ही विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर आगीत माझे मालकीचे होडीचे व गाळयांचे जळून नुकसान झालेले आहे. यामध्ये ३ लाख रुपयांची लाकडी होडी, १ लाख ७५ हजार रुपयांची मासेमारी रापणीची १४ जाळी व शिसे व बोया असलेली जूनी वापरतील साहित्य यांचा समावेश होता. दरम्यान या प्रकरणी निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. यादव, सहाय्यक पोलीस उपनरीक्षक श्री. वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी करीत आहेत.

\