राणे, राऊत यांच्यासह ९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद…

877
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गात ६५ टक्‍के मतदानाची शक्‍यता; उमेदवारांसह, जनतेला ४ जूनच्या निकालाची प्रतीक्षा…

सिंधुदुर्ग, ता. ०७ : लोकसभेसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीने मतदान झाले. सायंकाळ पाच वाजेपर्यंत ५८ टक्‍के मतदान झाले असले तरी शेवटच्या तासाभरात सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या रांगा होत्या. त्‍यामुळे सरासरी ६५ टक्‍के मतदान होण्याची शक्‍यता आहे. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ९ उमेदवार रिंगणात आहेत. तर खरी लढत केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात आहे.

आज सायंकाळी सात वाजल्‍यापासून मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे आणि कर्मचारी विधानसभा मतदारसंघ मुख्यालयाच्या दिशेने रवाना करण्यात आली. तर मध्यरात्रीनंतर सर्व मतदान यंत्रे रत्‍नागिरीकडे कडेकोट बंदोबस्तात पाठवली जाणार आहेत. सिंधुदुर्गात ७५ टक्‍के पर्यंत मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. त्‍यामुळे आजारी, अपंग मतदारांनाही मतदान केंद्रापर्यंत कार्यकर्त्यांनी आणले जात होते.

केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी वरवडे येथील मतदान केंद्रात मतदान केले. आमदार वैभव नाईक यांनी कणकवली शहरात तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत मतदानाचा हक्‍क बजावला. मतदान आटोपल्‍यानंतर श्री.राणे यांनी मताधिक्‍याने विजयी होण्याचा दावा केला. तर विनायक राऊत यांनी अडीच लाखांनी विजयी होऊ असा विश्‍वास व्यक्‍त केला. जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत झाली. यंदाची निवडणूक कमालीची चुरशीची झाली असल्‍याने उमेदवारांसह सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष आता ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

\