शेर्पे गावात भाजप पदाधिकाऱ्यांकडून रामकृष्ण राऊत यांना मारहाण…

139
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विनायक राऊतांचा प्रचार केल्‍याचा राग; दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल…

कणकवली,ता.०८: लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा प्रचार केल्‍याचा राग ठेवून शेर्पे वरचीवाडी येथील रामकृष्ण बाळकृष्ण राऊत (वय ५८) यांना दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर मारहाण प्रकरणातील भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई न झाल्‍यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर यांच्यासह अन्य नेत्‍यांनी दिला आहे. ही घटना मंगळवारी मतदान आटोपल्‍यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

याबाबत रामकृष्ण राऊत यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे की, त्‍यांनी शेर्पे येथील आपले रेशन दुकान सहा वाजता बंद करून तेथीलच चहाच्या दुकानात मित्रांसमवेत गप्पा मारत बसले होते. त्यादरम्यान दोन कार भरून दहा ते पंधरा व्यक्ती तेथे आले त्यांच्यामध्ये रवींद्र जठार, दिलीप तळेकर व नारायण शेटये हे होते. यावेळी कारमधून आलेल्या व्यक्तीनी अचानक रामकृष्ण राऊत यांच्यावर दांड्याने हल्ला करून हाताच्या थापट्याने व लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच “तू विनायक राऊत यांच्या प्रचाराचे काम का करतोस? तुला मस्ती आली आहे का?” अशी विचारणा करत मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत “पुन्हा विनायक राऊत यांचा प्रचार केला तुला ठार मारू” अशी धमकी देत तेथून निघून गेले. या मारामारीत रामकृष्ण राऊत यांना गंभीर दुखापत झाली असून ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

दरम्‍यान भाजप कार्यकर्त्यांनी राऊत यांना मारहाण केल्‍याचे वृत्त समजताच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, शिवसेना पदाधिकारी कन्हैया पारकर, कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले जखमी रामकृष्ण राऊत यांची भेट घेतली. दरम्यान आमच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कणकवली पोलिसांनी तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर व शिवसेना नेते सतीश सावंत यांनी कणकवली पोलिसांना दिला आहे.

\