महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून पहिले एक्सलंट सेंटर कोकणात…

234
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संतोष मंडलेचा ; चिपी विमानतळ, इनोव्हेटिव्ह ग्रीन फिल्ड, जीएसटी करप्रणाली विषयावर घेतले निर्णय…

मालवण, ता. १७ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर या शिखर संस्थेची शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. याचे औचित्य साधत पर्यटन, फलोत्पादन, शेती, मत्स्य या सर्व विषयांशी निगडीत पहिले एक्सलंट सेंटर कोकणात उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून हे सेंटर उभारले जाणार असून या सेंटरला स्व. एकनाथ ठाकूर यांचे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या चेंबरच्या कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला आहे अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर या संस्थेच्या कार्यकारिणीची सभा आज तोंडवळी येथे पार पडली. यावेळी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललीत गांधी, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष उमेश दशारथी, सेक्रेटरी सागर नागरे, जी. सी. मेंबर विजय केनवडेकर यांच्यासह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, जळगाव, नाशिक, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील चेंबरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी श्री. मंडलेचा म्हणाले, संस्थेची शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. या दृष्टीकोनातून पहिले एक्सलंट सेंटर कोकणात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. मात्र पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ज्या सुविधा निर्माण होणे अपेक्षित होते त्या झाल्या नाहीत. कोकणातील पर्यटन, फलोत्पादन, शेती क्षेत्र या विषयांशी निगडित हे एक्सलंट सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरमुळे व्यावसायिकांना, उद्योजकांना आपला व्यवसाय विकसित करण्यास मदत मिळणार आहे. या सेंटरला राज्य शासनाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळावे यासाठी चेंबरच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व पक्षांचे नेते यांच्याशी चर्चा करून कसा साकारता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. या एक्सलंट सेंटरमध्ये आंबा, काजू, नारळ प्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशनरी असेल. या मशनरींचा छोट्या शेतकर्‍यांना उपयोग करता येऊ शकेल. या सेंटरमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील सहाही विभागात अशा सेंटरचे क्लस्टर असेल. या सेंटरच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना प्रेरणा, प्रोत्साहन व सुविधा मिळतील. त्याचबरोबर या सहाही विभागांचा आर्थिक विकास व्हायला मदत मिळेल.
जीएसटी करप्रणालीमध्ये आतापर्यंत साडे नऊशे दुरूस्त्या करण्यात आल्या. या दुरूस्त्यांमुळे कर सल्लागारही त्रस्त आहेत. जीएसटी करप्रणालीत ज्या चुकीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत देशात तीव्र नाराजी व्यक्त होत असून चुकीचा पद्धतीने होणार्‍या दुरूस्त्यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे ज्या अन्यायकारक तरतुदी, त्रुटी आहेत त्या दूर व्हाव्यात. करात सुसुत्रता यावी यासाठी कॅटने 26 फेब्रुवारीला देशव्यापी व्यापार व वाहतूक बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात संपूर्ण देशात एक दिवस सर्व व्यापार व वाहतूक बंद राहणार आहे. या बंदला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दिला असून राज्यात या आंदोलनाचे नेतृत्व ही संस्था करणार आहे असे श्री. गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्याच्या सातत्याने तारखा दिल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय चेंबर कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. चेंबरने कोल्हापूर येथील विमानतळ सुरू व्हावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. त्यामुळे चिपी विमानतळही लवकरात लवकर सुरू होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे श्री. मंडलेचा यांनी सांगितले.
इनोव्हेटीव्ह ग्रीन फिल्ड संदर्भात चेंबरचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, संबंधित विभागांचे अधिकारी यांची भेट घेणार आहेत. या प्रकल्पात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी असे मत आशिष पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केले. चेंबरच्या विविध उपक्रमांमध्ये स्थानिक व्यापार्‍यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. व्यापारी, उद्योजकांनी चेंबरच्या उपक्रमात सहभाग दिल्यास हे शिवधनुष्य उचलणे चेंबरला सहज शक्य होईल असेही श्री. मंडलेचा यांनी यावेळी स्पष्ट केले.

\