मडुरा गावातील जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करा…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

यशवंत माधव यांची मागणी; भाजपाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन…

बांदा,ता.३१:  मडुरा पंचक्रोशीतील ग्रामीण भाग गोवा बाजारपेठेशी संलग्न आहे. दोन डोस पूर्ण झाल्याशिवाय गोव्यात प्रवेश मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व किरकोळ व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. लसीकरणाचा टप्पा वाढवून मडुरा गावातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी भाजप सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत माधव यांनी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम गेले अनेक दिवस सुरू असून लसीकरणाचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत आहे. मडुरा गावात किमान दोन हजार लोकसंख्या असून फक्त चार वेळा लसीकरणाचे डोस आले व आतापर्यंत सुमारे चारशे लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमानीही गावात दाखल होणार आहेत. गावातील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना अजून दुसरा डोस मिळालेला नाही. पहिल्या डोसची मुदत पूर्ण होत आलेली असल्याने ते दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तरी आपण प्राधान्याने मडुरा गावाचे पूर्णक्षमतेने लसीकरण करावे अशी मागणी यशवंत माधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मडुरा गावातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करू असा शब्द दिल्याचे श्री. माधव यांनी सांगितले.

\