बांदयात होणाऱ्या उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

राष्ट्रीय महामार्ग विभागाची माहिती; लवकरच होणार निविदा प्रक्रिया…

बांदा
मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या शहरातील कट्टा कॉर्नर येथील ६०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय पातळीवर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले आहे.
बांदा शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी ८० कोटी रुपये तर सटमटवाडी येथील भुयारी बॉक्सवेलसाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची भूमिपूजने ७ जुलै २०२० रोजी करण्यात आली होती. त्यानंतर जमिनीची खोदाई करून माती परीक्षण करण्यात आले होते. पावसाळ्यात चार महिने काम बंद ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आय. एस. मणेर, सहाय्यक अभियंता दत्तात्रय जाधव यांनी या उड्डाणपुलाचे रेखाचित्र तयार करून ते रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयात पाठविण्यात आले. त्यानंतर अंतिम आराखड्याला राष्ट्रीय मार्ग रस्ते विकास महामंडळाने मंजुरी दिली होती. त्यानंतर उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.
लवकरच केंद्रीय पातळीवर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र स्थानिक बांदा ग्रामपंचायतीला माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.
याठिकाणी अपघातांची होणारी मालिका थांबविण्यासाठी उड्डाणपूल गरजेचे असल्याने वाफोलि येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी २६ जानेवारी २०१९ रोजी महामार्गावरच लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर याठिकाणी उड्डाणपूल करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर सातत्याने आईर यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून याठिकाणी उड्डाणपूल मंजूर करून घेतले. उड्डाणपुलाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आल्याने उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फोटो:-
बांदा येथील उड्डाणपुलाचे नियोजित रेखाचित्र.

\