अन्यथा पालकमंत्री केसरकरांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू : महेश सारंग

2

अवैध धंद्याच्या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे

सावंतवाडी,ता.८: तालुक्यातील अवैद्य धंदे बंद करण्यास पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सपशेल अयशस्वी ठरले आहेत.अशा प्रकारचे धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी गोष्ट आहे.असा आरोप करत हे अवैध धंदे तात्काळ बंद करा अन्यथा १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे दिला.
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका,जुगार भविष्यासाठी घातक आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व पक्षियांनी एकत्र येण्याची गरज आहे असे आवाहन सारंग यांनी केले.ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी दादू कविटकर,मनोज नाईक,अमित परब आदी उपस्थित होते.
श्री सारंग म्हणाले सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव गावात दारू विक्री करणाऱ्या लोकांकडून पोलिसांसमोरच पंचांना मारहाण झाली. हा प्रकार दुदैवी आहे. याबाबत पोलिसांकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शिवसेनेचे असताना त्यांच्याच लोकांना आंदोलनाची भाषा करावी लागत आहे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्याभरात शहरासह तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. अन्यथा पालकमंत्री केसरकर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू. पुढे म्हणाले आंबेगावच्या महिला सरपंचांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे.मात्र या पुढे त्या ठिकाणी भाजपचा सरपंच बसणार आहे.

4