मोती तलावातील वादात असलेले “स्कुबा डायविंग” अखेर बंद…?

350
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ठेकेदाराचा निर्णय: पुन्हा ठेकेदार नेमून उपक्रम सुरू करणार,साळगावकर…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.१६: येथील मोती तलावात सुरू करण्यात आलेले स्कुबा डायविंग आणि बोटिंग संबंधित ठेकेदाराने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या ठिकाणी असलेल्या बोटी त्यांनी आज माघारी नेल्या आहेत.आपला शिरोडा येथील समुद्रातील स्कूबा डायविंगचा हंगाम सुरू झाल्याचे कारण पुढे करून त्यांनी येथील बोटी नेल्या.याबाबत त्यांनी सावंतवाडी पालिकेला तसे पत्र दिले आहे.असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
येथील मोती तलावात स्कुबा डायविंग चालू करण्यावरून मोठे वाद घडले होते.नगराध्यक्ष आणि मेरीटाईम बोर्ड यांच्यात वाद रंगला होता.तळ्यात बोटिंग आणि स्कुबा डायविंग करण्यासाठी परवानगी देता येऊ शकत नाही असे मेरिटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे होते.तसेच हा उपक्रम चालू ठेवल्यास दरमहा पैसे द्यायला लागतील असे अधिकार्‍यानी सांगितले होते.
याबाबतचा आरोप नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला होता.या नंतर पालकमंत्री दीपक केसरकर व बबन साळगावकर यांच्यात सुद्धा शाब्दिक युद्ध रंगले होते.अखेर यावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात केली होती.हा प्रकल्प त्यानंतरसुद्धा सुरू होता.त्याला लोकांकडून आणि विशेषता बाहेरून आलेल्या पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.त्यामुळे हा प्रकल्प या ठिकाणी यशस्वी होईल असे वाटत असतानाच आज अचानक संबंधित ठेकेदाराने आपल्या बोटी नेल्या आहेत.याबाबत पालिकेकडे त्यांनी आपले पत्र दिले.यात शिरोडा येथील हंगाम ३१ ऑगस्ट पासूग सुरू झाल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.अचानक बोटी तलावातून बाहेर काढण्यात आल्यामुळे नागरिकांत चर्चा होती.
याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले संबंधित ठेकेदाराचा हंगाम सुरू झाल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.केवळ पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण त्यांना काही दिवस ही संधी दिली होती. परंतु आता नगरपालिकेकडून योग्य तो ठेकेदार नेमून हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.त्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील.

\