आठ दिवसात शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार…

2

अमित सामंत : तिन्ही जागा लढविण्यासाठी तयारी सुरू…

मालवण, ता. २२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेविकांचा शिवसेनेतील प्रवेश हा स्वार्थासाठी झाला आहे. कोणतीही पूर्वकल्पना त्यांनी प्रवेश केल्याचे वाईट वाटते. शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
वायरी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष विश्‍वास साठे, शहराध्यक्ष आगोस्तीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, रमण वाईरकर, सदानंद मालंडकर, बाबू डायस, सुजन खोबरेकर, किरण रावले, विनोद आळवे, अशोक पराडकर, हरिश्‍चंद्र परब, बाळ कनयाळकर, शिवाजी घोगळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. मात्र अद्याप आघाडी जाहीर झाली नाही. त्यामुळे आघाडी न झाल्यास विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तीनही जागा लढविण्याची तयारी सुरू आहे. आघाडी झाल्यास त्यानुसार लढत देऊ. सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देईल.
कार्यकर्त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या आहेत. आगामी काळात गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस असे अभियान राबविण्यात येणार आहे. याची सुरवात या तालुक्यापासून केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात एका कठीण प्रसंगातून जात आहे. येत्या काळात पक्ष उभारी कसा घेईल यादृष्टीकोनातून प्रयत्नशील राहणार असून प्रत्येक गावात एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असेल यादृष्टीने काम केले जाणार आहे असेही श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

26

4