विनायक राऊत ; ३ मे नंतर अधिक दक्षता घ्यावी लागेल…
मालवण, ता. १९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला सर्वसामान्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. लॉकडाऊनच्या काळात पोलिस, आरोग्य, महसूलसह अन्य विभागांनी आणि लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले आहे. त्यामुळे कोकणात कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळाली. ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असून त्यापुढील काळ हा कसोटीचा असणार आहे. चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने शहरांमधील प्रवेशद्वारांवर कडक बंदोबस्त ठेवावा लागेल असे खासदार विनायक राऊत यांनी येथे स्पष्ट केले.
मालवण दौर्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी मालवण नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकार्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील, बबन शिंदे, हरी खोबरेकर, बाबी जोगी, यतीन खोत, मंदार केणी, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, गणेश कुडाळकर, प्रवीण रेवंडकर, आतू फर्नांडिस, यशवंत गावकर, विकी चोपडेकर, नितीन तायशेट्ये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांमार्फत घरपोच सुविधा दिल्या जात आहेत. मासळी लिलावाच्या ठिकाणी होणार्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यातही यश मिळविले आहे. शहरात मुबलक प्रमाणात भाजीपाला, फळे उपलब्ध आहेत. परजिल्ह्यातून भाजीपाला आणण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दुचाकी वाहनांना बंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे असे स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाने केलेल्या आवाहनाला कोकणात सर्वसामान्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच कोकण सुरक्षित राहिले आहे. यात अधिकारीवर्गाचे, लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य मिळाले. मात्र यानंतरही गाफील राहून चालणार नाही. ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. मात्र त्यानंतर कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागेल. शहरांच्या प्रवेशद्वारांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवणे आवश्यक राहणार आहे असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
मत्स्य सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी डिझेल कोट्यासंदर्भात खासदार राऊत यांचे लक्ष वेधले. यावेळी डिझेल परताव्याची मंजूर झालेली रक्कम माघारी गेली असली तरी वित्त विभागाकडून ती मत्स्य सोसायट्यांना लवकरच उपलब्ध होईल. लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद झाले असले तरी ते येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू होतील. यात जी अत्यावश्यक कामे मार्गी लावणे आवश्यक आहेत ती कामे सुरू होणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.