असनिये कणेवाडी धबधबा प्रवाहित…

740
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओटवणे/दत्तप्रसाद पोकळे, ता. २९ : हिरवीगार गर्द वनराई, धुक्याची झालर अशा बेधुंद करणार्‍या निसर्गाच्या साथीने सह्याद्रीच्या कड्यावरून फेसाळत कोसळणाऱ्या असनिये येथील कणेवाडी – धबधब्याकडे सध्या पर्यटकांची पावलें वळत आहेत.गेले दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झाला असुन,पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्यापर्यंत पोहचणे आव्हानात्मक असले तरी साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्याजवळ गर्दी होताना दिसत आहे.निसर्ग सहलीसाठी या ठिकाणची निवड सध्या होत आहे.

सहयाद्रीच्या कुशीत वसलेले असनिये गाव निसर्ग सौंदर्यासाठी व वन्यजीवांच्या वस्तीसाठी प्रसिद्ध आहे.सहयाद्रीचे डोंगर,गर्द हिरवेगार जंगल,माड-फोफळीची कुळागरे,नैसर्गिक जल स्रोत, दारुबंदी यासाठी असनिये गाव प्रसिद्ध आहे.या सर्व निसर्ग सौंदर्याचा मुकुटमणी असलेल्या कणेवाडी येथील धबधब्यामुळेही गेली काही वर्षे असनिये गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. असनियेहून घारपी गावचा प्रवास सुरू झाल्यावर कणेवाडी येथील घाटमार्गात समोरं दिसतं थक्क करणारं, डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारं दृश्य.हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारा धबधबा,डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरवेगार जंगल, रिमझिम कोसळणारा पाऊस, धुक्याची झालर आणि दुसर्‍या बाजुला ताठ मानेनं डौलत उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग.सारं काही मनाचा, शरीराचा थकवा घालवणारं असंच.

असनिये-घारपी मार्गावरून सहज दिसणारा हा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने धबधबा ओसंडून वाहत आहे. हा धबधबा सहयाद्रीच्या डोंगर माथ्यावरून रोरावत खाली कोसळतो. त्यातून होणारा प्रचंड आवाज तसेच उडणारे तुषार पाहणे पर्यटकांसाठी आल्हाददायक ठरत आहे.

साहसी पर्यटनासाठी पर्वणी :
हा धबधबा सहयाद्री पर्वतरांगांच्या अवघड भागात असल्याने तसेच पायाभूत सुविधांच्या अभावामुळे धबधब्याजवळ पोहोचणे आव्हानात्मक ठरते. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. तेथून निमुळत्या पायवाटेने धबधब्याजवळ जाता येते. मात्र, हे सर्व अडथळे पार करून धबधब्यापर्यंत गेल्यावर साहसी पर्यटनाचा आनंद
मिळतो.साहसी पर्यटनासाठी हा धबधबा प्रसिद्ध होत असून साहसी पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांची तसेच युवकांची या धबधब्याजवळ गर्दी होताना दिसत आहे. गोवा, दोडामार्ग, बांदा, सावंतवाडी तसेच आंबोलीशिवाय वर्षा पर्यटनाची अन्य ठिकाण शोधणारे पर्यटक या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत.

धबधब्याजवळ असे जाता येते:

सावंतवाडी-ओटवणे-भालावल-असनिये: 22 किमी

गोवा-बांदा-विलवडे-असनिये:17 किमी

दोडामार्ग-कळणे-तळकट-असनिये:35 किमी.

\