जम्प नेटवर्क आणि जिल्हा प्रशासनात करार

2

कुक्कुटपालन, दुधाळ गायी पालनासाठी करणार सहकार्य; दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी ता.२९: जिल्ह्यात शेतीपूरक जोडधंद्यातून आर्थिक उन्नती व्हावी यासाठी चांदा ते बांदा योजनेतर्गत कुकुटपालन व दुधाळ गायी पालन या दोन योजना यशस्वी पणे राबविण्याच्या दृष्टीने जम्प नेटवर्कचे हर्षवर्धन साबळे यांच्याशी प्रशासनाने करार केला असल्याची माहिती पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज दिली. यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजुलक्ष्मी, आयटी क्षेत्रातील हर्षवर्धन साबळे यासह अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर यांनी आज चांदा ते बांदा योजनेतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेंसदर्भात संबंधित अधिका-यांशी चर्चा केली. तर महिला व शेतक-यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा व्हावा यादृष्टीने उद्योजकांशी संपर्क साधून या योजना राबविण्याबाबत करार करण्यात आला. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी चांदा ते बांदा योजनेतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी मोठ मोठे उद्योजक पुढे येवू लागले आहेत. जिल्ह्यातील महिलांना अंड्यावरील कोंबड्या आणि दुधाळ गायी म्हशी या योजना राबविण्यासाठी आयटी इंडस्ट्रीजचे हर्षवर्धन यांनी पुढाकार घेतला असून त्याच्याशी आज प्रशासनाने करार केल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
या दोन्ही योजना यशस्वीपणे केल्या तर जिल्ह्यात दुध व अंडी उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न होऊ शकेल. यापुर्वी शासनाच्यावतीने ७५ टक्के अनुदानावर ही योजना राबविली जात होती. तर २५ टक्के लाभार्थीना खर्च करावे लागत होते. आता या योजनेत महिलांना खर्च करावा लागणार नाही. १०० खर्च हा कंपनीच करणार आहे. तर हॅप्पी एज ब्रॅड खाली देशभरात याची प्रचार प्रसिद्धी करून बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत लवकरच प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
या दोन योजनांप्रमाणे चांदा ते बांदा योजनेतर्गत आणखीन योजना कार्यांन्वित करण्यात आल्या आहेत. या योजना राबविण्यासाठी जाहिरात देवून राज्यभरातील उद्योजकांना आवाहन करण्यात आले आहे. उद्योजकांचा प्रतिसादही लाभत आहे. विविध योजनांचे उद्योजकांशी करार करून सर्व योजना चांदा ते बांदा योजनेतर्गत प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. यातून जिल्ह्यातील महिला आणि शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचे फळ लवकरच दिसून येईल.
जम्प नेटवर्कच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील उच्च शिक्षित उमेदवारांना युपीएससी व आयपीएससी दर्जाच्या स्पर्धा परीक्षेचा सराव आणि प्रशिक्षण मिळावे यादृष्टीने तीन वर्षांत दोन कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. प्रतिवर्षी १५० मुलांचा खर्च ही कंपनी उचलणार असल्याचेही पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील महिला, शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही पालकमंत्री केसरकर यांनी केले.

21

4